Home साप्ताहिक 'ती'ची गोष्ट ‘लॉर्ड्स’वरच्या लाडक्या लेकी!

‘लॉर्ड्स’वरच्या लाडक्या लेकी!

0
‘लॉर्ड्स’वरच्या लाडक्या लेकी!

सतीश स. कुलकर्णी

क्रिकेटची पंढरी’ ही लॉर्ड्स मैदानाची ओळख. साहेबांच्या भाषेत ते आहे ‘Home of Cricket’. त्या घरच्या मैदानावर ‘बाई’साहेबांना पराभवाची धूळ चाखायली लावली, भारतीय मुलींनी! विजय कसा निर्विवाद, दणदणीत – २७० धावांनी. कसोटी सामन्यातल्या दोन्ही डावांत यजमानांना दोनशेचा उंबरठा ओलांडता आला नाही. त्याहून मोठं अधिक्य.फार कडक यम-नियम असलेल्या आणि सोवळे-ओवळे पाळणाऱ्या लॉर्ड्स मैदानाने एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर बदलायला सुरुवात केली. तेथील पॅव्हिलियन आणि ऐतिहासिक लाँग रूम येथे प्रवेश करण्यास महिलांना मज्जाव होता. ही मनाई उठली ती २११ वर्षांनंतर. आणि त्यानंतर २८ वर्षांनंतर या ऐतिहासिक मैदानावर महिलांचा पहिला कसोटी सामना झाला. पुरुष तेथे कसोटी खेळू लागल्यानंतर १४२ वर्षांनंतर.

इतिहासाचा नवा अध्याय लिहिणारी ही लढत खेळण्याची संधी भारतीय संघाला मिळाली. त्या संधीचं सोनं भारतानं केलं. या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत भारतीय क्रिकेटचं काही फार बरं चाललेलं नव्हतं. वैभव, अभिषेक, श्रेयस, सॅमसन आणि मंडळींनी टी-२० क्रिकेटच्या लागोपाठ दोन मालिका गमावल्या होत्या – सहा सामने, सहा पराभव. महिलांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपान्त्य फेरी गाठण्यात अपयश आलेलं. भारतीय क्रिकेटचा निर्देशांक शेअर बाजाराप्रमाणे गडगडलेला.हा निर्देशांक मागील आठवड्यात पुन्हा जोरदार उसळी मारून वर आला – त्याचं श्रेय क्रांती गौड, यास्तिका भाटिया, उपकर्णधार स्मृती मानधना, स्नेह राणा, ऋचा घोष, कर्णधार हरमनप्रीतकौर यांना. त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांना. सामन्यात चार दिवसांतील एकूण १० सत्रांमध्ये खेळ झाला. त्यातील एखाद्याच सत्रात दोन्ही संघांची कामगिरी साधारण समसमान झाली. एरवी बाकीच्या सर्व सत्रांमध्ये भारतीय संघानं पूर्ण वरचष्मा राखलेला.

इंग्लिश संघाची कर्णधार नॅट शिवर-ब्रंट हिने नाणेफेक जिंकून गोलंदाजी का स्वीकारली, हा प्रश्न तिथले क्रीडा समीक्षक आणि सामान्य चाहते दुसऱ्या दिवसांपासून विचारू लागले होते. पहिल्या दिवसाच्या मानकरी स्मृती, हरमन आणि दीप्ती शर्मा. सोफी एकलस्टन हिच्या नावावर दिसणाऱ्या तीन बळींमधले दोन अगदी तळाचे. त्याच दिवशी शेवटच्या सत्रात भारताची जलदगती गोलंदाज क्रांती गोड हिनं टॅमी ब्यूमाँट हिला बाद करून दुसऱ्या दिवशी काय वाढून ठेवलेलं असेल, याची चुणूक दाखविली.क्रांतीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर दुसऱ्याच दिवशी भारतानं सामन्यावर घट्ट पकड मिळवली. अवघ्या बाविशीच्या आणि दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या या मुलीनं निम्मा संघ गारद केला. तिचा मारा अचूक होता. फलंदाजांना तिनं थोडीही मोकळीक दिली नाही. दिवसाचा खेळ संपताना स्मृतीच्या नावावर आणखी एक अर्धशतक होतं आणि भारताची आघाडी अडीचशेच्या पार गेली होती. मोठा इतिहास असलेल्या लॉर्ड्स मैदानाच्या ‘ऑनर्स बोर्ड्स’वर पहिल्या भारतीय महिला खेळाडूचं नाव कोरलं जाणार हे निश्चित झालं होतं – पाच बळी घेणारी क्रांती.

‘ऑनर्स बोर्ड्स’वर आणखी एक भारतीय नाव येणार होतं तिसऱ्या दिवशी. यष्टिरक्षक फलंदाज यास्तिक भाटिया हिच्या रूपानं. तिच्या शतकामुळे आणि नंतर ऋचा घोष हिनं केलेल्या टोलेबाजीमुळे भारतानं इंग्लंडपुढे साडेचारशे धावांचं आव्हान ठेवलं. त्याच दिवशी इंग्लिश संघाने सहा गडी गमावले. या सामन्यानंतर ब्यूमाँट आणि हीदर नाईट निवृत्त झाल्या. त्यांना अर्थातच पराभवाच्या साथीनं निरोप घ्यावा लागला.भारताचा विजय आणखी एका दृष्टीनं महत्त्वाचा होता – कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाच्या पदार्पणाचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्याला क्रांती व यास्तिका यांनी वेगळीच चमक दिली.सडपातळ असलेली क्रांती बुंदेलखंडातली – छतरपूर जिल्ह्यातील घुवारा हे तिचं गाव. आता त्या छोट्या गावातील चाळीसहून अधिक मुली हातात बॅट आणि चेंडू घेऊन तिच्याप्रमाणेच मैदान गाजवण्याचं स्वप्न पाहत आहेत. वीमेन्स प्रीमियर लीगमध्ये निवड झाल्यावर पहिल्याच सामन्यात तिने छाप उमटवली. तिचा पहिला बळी होता ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग.सडपातळ चणीची क्रांती वेगानं मारा करते. तिच्या गतीनं अपघात होतो तो फलंदाजांचा. या कसोटी सामन्यात तिनं चेंडूचा टप्पा आणि दिशा इतकी चोख ठेवली की, फलंदाजाला मोकळीकच मिळू नये. चेंडूच्या शिवणीचाही तिनं खुबीनं वापर केला. तिचं कौतुक करताना प्रशिक्षक राजीव बिलथरे यांना जणू शब्द अपुरे पडतात. या विद्यार्थिनीबद्दल ते सांगतात की, फार उत्साही, चपळ मुलगी आहे ती. अगदी आदर्श अॅथलेट म्हणावी अशी. धारदार गोलंदाजीनं ती फलंदाजांना चक्रावून टाकते.

‘ऑनर्स बोर्ड्स’वर नाव झळकलेलं दुसरं नाव यास्तिका भाटिया. बडोद्याची ही मुलगी मोठ्या दुखापतीतून बाहेर पडली आहे. एकदिवशीय विश्वचषक भारतात होत असताना आपल्याला खेळता येत नाही, यामुळं फार वाईट वाटत होतं तिला. बंगलोरमध्ये राहून ती जिद्दीने दुखापतीमधून सावरली आणि पुन्हा मैदानावर उतरली.कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळविलेली, बॅडमिंटनमध्ये जिल्हा अजिंक्यवीर असलेली यास्तिका नंतर क्रिकेटकडे वळली. बडोद्याच्या ‘यूथ सर्व्हिस सेंटर’च्या मैदानावर तिनं क्रिकेटचे धडे गिरवले. गोलंदाजी सोडून यष्टिरक्षण करू लागली. किरण मोरे, राजकुंवर गायकवाड यांनी तिच्यातील गुण हेरले. या क्लबचे संस्थापक व अर्जुन पारितोषिक विजेते सुधीर परब तिच्या कामगिरीमुळे बेहद्द खूश झाले. त्यांनी सांगितलं, ‘यास्तिकाला मागचं वर्ष चांगलं गेलं नाही. दुखापतीमुळे ते वाया गेलं. त्यातून बाहेर पडण्यासाठी सहा महिने तिनं मेहनत केली आणि पुन्हा संघात स्थान मिळवलं. संधी मिळताच तिनं नाणं खणखणीत वाजवलं!’लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावण्याची कामगिरी गुजरातच्या दोनच खेळाडूंना आजवर साधली. पहिलं नाव विनू मनकड. त्यांच्यानंतर पाऊण शतकाने यास्तिकाने ही कामगिरी केली. बिशनसिंग बेदी, भागवत चंद्रशेखर आणि कपिलदेव या दिग्गजांच्या पंगतीला क्रांती गौड बसली आहे. समस्त भारताच्या सध्या ‘लाडक्या लेकी’ बनलेल्या या दोघी. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लॉर्ड्सवर इतिहासाची नवीन पानं लिहिली आहेत, हे खरंच. shabdkul@outlook.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here