Home ब्रेकिंग न्यूज Shivsena : ६ खासदारांच्या शिवसेनेत विलिनीकरणाला मंजुरी

Shivsena : ६ खासदारांच्या शिवसेनेत विलिनीकरणाला मंजुरी

0
Shivsena : ६ खासदारांच्या शिवसेनेत विलिनीकरणाला मंजुरी

– लोकसभा अध्यक्षांचा निर्णय; उबाठा गटाला मोठा धक्का

मुंबई : उबाठा गटातून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या सहा खासदारांच्या स्वतंत्र गटाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्यास लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत मंजुरी दिली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या मान्यतेनंतर लोकसभा सचिवालयाने यासंदर्भातील अंतिम निर्णय जाहीर केला असून, शनिवारी याचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून, लोकसभेत आता शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे संख्याबळ आणि राजकीय वजन वाढले आहे. (Shivsena)

लोकसभा निवडणुकीत उबाठा गटाचे (UBT) एकूण ९ खासदार निवडून आले होते. त्यापैकी दोन तृतीयांश म्हणजेच ६ खासदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला होता. या खासदारांची खासदारकी रद्द व्हावी यासाठी उबाठा गटाने कायदेशीर पावले टाकत लोकसभा अध्यक्षांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. तसेच आमचा पक्ष स्वतंत्र असून आम्ही कोणामध्येही विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घेण्यात यावी, अशी विनंतीही उबाठा गटाने लोकसभा सचिवालयाला पत्र लिहून केली होती. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी उबाठा गटाचा आक्षेप फेटाळून लावत बंडखोर खासदारांच्या बाजूने कौल दिला आहे. (Shivsena)

https://prahaar.in/2026/07/18/devendra-fadnavis-major-decision-by-the-bjp-for-chief-minister-fadnavis-birthday-no-to-hoardings-banners-and-advertisements-appeal-made-to-donate-to-the-chief-ministers-relief-fund/

या सहा खासदारांनी आधी दिल्लीत एकत्र येत स्वतंत्र गट स्थापन केला होता. या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी सुरुवातीला मान्यता दिली होती. त्यानंतर मुंबईतील एका जाहीर कार्यक्रमात या सर्व खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर संसदेच्या पातळीवर कायदेशीर विलिनीकरणाची प्रक्रिया बाकी होती, त्यावर आता लोकसभा सचिवालयाच्या मंजुरीचे शिक्कामोर्तब झाले आहे. (Shivsena)

आम्ही तोडणारे नव्हे जोडणारे – एकनाथ शिंदे

या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधताना उबाठा गटावर जोरदार निशाणा साधला. आम्ही तोडणारे नसून जोडणारे आहोत, असे सांगत शिंदे म्हणाले की, हे सहा खासदार स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आलेले नाहीत. आपल्या मतदारसंघातील लाखो मतदारांना न्याय देण्यासाठी आणि जनतेप्रती असलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आम्ही या सर्व लोकप्रतिनिधींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि त्यांच्या मतदारसंघासाठी पुरेसा विकासनिधी देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

https://prahaar.in/2026/07/18/infiltration-bid-foiled-in-j-indian-army-thwarts-pakistans-infiltration-attempt-in-rajouri/

त्यांच्याकडे फक्त लेना बँक, देना बँक नाही : 

उबाठा गटाकडून होणाऱ्या पैशांच्या आरोपांचा समाचार घेताना शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, जे लोक आरोप करतात त्यांना पैशांशिवाय काहीच दिसत नाही, कारण त्यांच्याकडे फक्त लेना बँक आहे, देना बँक नाही. कोणीही पक्ष सोडला की पैशांचे आरोप करण्याऐवजी हजारो कार्यकर्ते, आमदार आणि खासदार का सोडून जात आहेत, याचे त्यांनी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नेत्याने आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहणे आवश्यक असते, परंतु येथे लोकप्रतिनिधींना रामभरोसे सोडले जात असल्यामुळेच ते बाहेर पडत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

…………………

लोकसभेतील सुधारित पक्षीय बलाबल

लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, १८ व्या लोकसभेतील सर्व पक्षांची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे:

भारतीय जनता पक्ष : २३९

इंडियन नॅशनल काँग्रेस : ९८

समाजवादी पक्ष : ३७

ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस : २८*

द्रविड मुन्नेत्र कळघम : २२

तेलगू देसम : १६

शिवसेना : १३

जनता दल (युनायटेड) : १२

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार : ८

लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) : ५

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) : ४

राष्ट्रीय जनता दल : ४

युवजन श्रमिका रयथू काँग्रेस पक्ष : ४

आम आदमी पक्ष : ३

इंडियन युनियन मुस्लिम लीग : ३

झारखंड मुक्ती मोर्चा : ३

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : ३

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया : २

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिंनवादी) (लिबरेशन) : २

जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स : २

जनसेना पक्ष : २

जनता दल (सेक्युलर) : २

राष्ट्रीय लोक दल : २

विदुथलाई चिरुथाईगल कात्ची : २

आझाद समाज पक्ष (कांशीराम) : २

आजसू पक्ष : १

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन : १

आपला दल (सोनेलाल) : १

आसाम गण परिषद : १

भारत आदिवासी पक्ष : १

हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर) : १

केरल काँग्रेस : १

मरुमलारची द्रविड मुन्नेत्र कळघम : १

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : १

राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष : १

रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पक्ष : १

शिरोमणी अकाली दल : १

सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा : १

युनायटेड पीपल्स पार्टी, लिबरल : १

झोराम पीपल्स मूव्हमेंट : १

अपक्ष : ७

रिक्त ३

सध्या लोकसभेत ७ अपक्ष खासदार आहेत. यामध्ये विशाल (दादा) प्रकाशबापू पाटील, राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव, अमृतपाल सिंह, सरबजीत सिंह खालसा, उमेशभाई बाबूभाई पटेल, अब्दुल रशीद शेख आणि मोहम्मद हनीफा यांचा समावेश आहे.

पश्चिम बंगालमधील बसिरहाट, मेघालयातील शिलाँग आणि आसाममधील नगाव या ३ जागा खासदारांचे निधन आणि राजीनाम्यामुळे रिक्त

* तृणमूल काँग्रेसच्या २८ पैकी २० खासदार यांची बैठक व्यवस्था स्वतंत्र असेल. हे सर्व खासदार ममता बॅनर्जी यांच्या पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या ८ खासदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here