Home महाराष्ट्र नाशिक Dhule : प्रसूतीसाठी गेली पण परत जिवंत आलीच नाही ! पिंपळनेरमध्ये महिलेच्या मृत्यूने संतापाचा स्फोट ; काय घडलं ?

Dhule : प्रसूतीसाठी गेली पण परत जिवंत आलीच नाही ! पिंपळनेरमध्ये महिलेच्या मृत्यूने संतापाचा स्फोट ; काय घडलं ?

0
Dhule : प्रसूतीसाठी गेली पण परत जिवंत आलीच नाही ! पिंपळनेरमध्ये महिलेच्या मृत्यूने संतापाचा स्फोट ; काय घडलं ?

Dhule : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरमध्ये (Pimpalner) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या २१ वर्षीय विवाहित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप करत आंदोलनाचा पवित्रा घेतला.

https://prahaar.in/2026/07/16/fifa-world-cup-2026-banner-displayed-by-argentine-players-sparks-controversy/

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, पूनम सोनू अहिरे (वय २१, रा. देगाव) यांना १४ जुलै २०२६ रोजी सकाळी पिंपळनेर येथील बसस्थानक परिसरातील तायडे हॉस्पिटल (Tayade Hospital) या खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत योग्य उपचार न मिळाल्यामुळेच पूनम अहिरे यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला. त्यामुळे काही वेळातच रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी प्रसूतीपूर्वी रक्ताची गरज लागू शकते, असे सांगितले होते. मात्र रक्ताची व्यवस्था होण्यापूर्वीच प्रसूती करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रसूतीनंतर पूनम अहिरे यांची प्रकृती अचानक बिघडली. गंभीर परिस्थिती असूनही वेळेत माहिती न दिल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. सायंकाळी उशिरा त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र रुग्णवाहिका येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला.

https://prahaar.in/2026/07/16/mumbai-water-stock-relief-for-mumbai-heavy-rainfall-in-the-lake-catchment-area-water-stock-at-48-66-two-lakes-overflowing/

अज्ञात व्यक्तींकडून रुग्णालयावर दगडफेक

घटनेची माहिती देगाव गावात पोहोचताच शेकडो ग्रामस्थ पिंपळनेरमध्ये दाखल झाले. संतप्त नागरिकांनी रुग्णालयासमोर रस्ता रोको करत, डॉ. तायडे यांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दरम्यान, काही अज्ञात व्यक्तींनी रुग्णालयावर दगडफेक केल्याची घटनाही घडली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करत जमावाला शांत केले. दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात (Pimpalner Police Station) डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून, जिल्हा शल्यचिकित्सकांचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे (Namdev Sahare) यांनी दिली आहे. सध्या पूनम अहिरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, परिसरातील तणाव निवळला आहे. मात्र या मृत्यूस जबाबदार कोण, आणि निष्काळजीपणा झाला का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here