क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना जनतेने बहाल केलेल्या महात्मा या सर्वोच्च पदवीचा ऐतिहासिक सन्मान कायम….
https://prahaar.in/2026/07/16/prime-minister-modi-to-dedicate-75-stations-to-the-nation-tomorrow-momentum-of-amrit-bharat-scheme-picks-up-pace/
मुंबई,नाशिक : राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार केल्यामुळे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना जनतेने बहाल केलेल्या “महात्मा” या सर्वोच्च पदवीचा ऐतिहासिक सन्मान कायम ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून महात्मा जोतीराव फुले यांचा भारत सरकारच्या राजपत्रात सन्मानपूर्वक उल्लेख करण्यात आला आहे. या निर्णयामुळे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या ‘महात्मा’ पदवीचा सन्मान कायम राहिला आहे.
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंती महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या प्रारंभीच्या राजपत्र अधिसूचनेत त्यांच्या नावापुढे ‘महात्मा’ ही जनतेने बहाल केलेली सर्वोच्च पदवी नमूद करण्यात आली नव्हती. या गंभीर बाबीकडे राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष वेधत, दिनांक ४ मे २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी तसेच केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री श्री गजेंद्रसिंह शेखावत यांना अधिकृत पत्राद्वारे राजपत्रात तातडीने दुरुस्ती करून ‘महात्मा जोतीराव फुले’ असा उल्लेख करण्याची आग्रही मागणी केली होती.
https://prahaar.in/2026/07/16/implement-the-rehabilitation-process-for-ajitsrushti-in-a-transparent-and-fair-manner-deputy-speaker-of-the-legislative-assembly-anna-bansode/
केंद्र सरकारने मंत्री छगन भुजबळ यांच्या या सूचनेची तात्काळ दखल घेत अधिकृत राजपत्र अधिसूचनेत आवश्यक सुधारणा केली असून, सुधारित राजपत्रात ‘महात्मा जोतीराव फुले’ असा सन्मानपूर्वक उल्लेख करण्यात आला आहे. महात्मा फुले यांच्या कार्याचा आणि देशातील कोट्यवधी नागरिकांच्या भावनांचा सन्मान राखत ही दुरुस्ती केल्याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार मानले आहे.
https://prahaar.in/2026/07/16/party-workers-should-step-forward-for-the-revision-drive-hon-radhakrishna-vikhe-patil/
दि.११ मे १८८८ रोजी मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने जोतीराव फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली होती. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही “महात्मा फुले हेच खरे महात्मा आहेत” अशा शब्दांत त्यांचा गौरव केला होता. त्यामुळे सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत ही पदवी वगळणे हे ऐतिहासिक सत्याशी विसंगत असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी निदर्शनास आणून दिले होते. या मागणीची केंद्र सरकारने तात्काळ दखल घेत अधिकृत राजपत्र अधिसूचनेत आवश्यक सुधारणा केली असून, नव्या सुधारित राजपत्रात ‘महात्मा जोतीराव फुले’ असा सन्मानपूर्वक उल्लेख करण्यात आला आहे.