मुंबई : मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि त्यामुळे समुद्रात वाहून गेलेला तसेच भरतीच्या लाटांमुळे पुन्हा किनाऱ्यावर येणाऱ्या कचऱ्याचे संकलन आणि विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) जुहू समुद्रकिनाऱ्यावर (Juhu Beach) स्वच्छता मोहीम अधिक तीव्र केली आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून जुहू समुद्र किनाऱ्यावरून दररोज सुमारे १८० मेट्रिक टन कचरा हटविण्यात येत आहे. मागील दहा दिवसात सुमारे १ हजार ८०० मेट्रिक टन कचरा हटवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. ही स्वच्छता मोहीम अधिक तीव्र करून जुहू समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्थानिक आमदार अमित साटम यांनी विशेष लक्ष घातले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त किरण दिघावकर यांनी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री तैनात केली आहे.
मुंबईतील समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सतत विशेष स्वच्छता मोहीम राबवित असते. या किनाऱ्यांवर येणाऱ्या मुंबईकरांसह पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यावर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा भर असतो.
https://prahaar.in/2026/07/16/mumbai-local-train-crime-minor-dispute-in-local-train-escalates-drastically-shocking-incident-occurs-at-midnight/
यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या काळात १ हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने लहान नाले आणि नैसर्गिक जलवाहिन्यांमधील तरंगता कचरा अरबी समुद्रात वाहून गेला होता. भरतीच्या लाटांमुळे हाच कचरा आता पुन्हा किनाऱ्यावर येत आहे. त्यामुळे स्वच्छता व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. मात्र अशा परिस्थितीतही घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे अतिरिक्त यंत्रणा उभी करून किनारा स्वच्छतेवर भर दिला जात आहे.
सुमारे ७ किलोमीटर लांबीच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर सध्या दररोज जवळपास ३५० मेट्रिक टन कचरा किनाऱ्यावर वाहून येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने समुद्र किनारा स्वच्छतेची मोहीम राबवत आहे. दररोज सुमारे १८० मेट्रिक टन कचरा हटविण्यात येत आहे. मागील दहा दिवसांतच समुद्र किनाऱ्यावरून सुमारे १ हजार ८०० मेट्रिक टन कचरा हटवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे.
आव्हानात्मक हवामानातही समुद्र किनारा स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकांसाठी खुला ठेवण्यासाठी महानगरपालिकेने मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणावर तैनात केली आहे. त्यामुळे समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेला अधिक गती मिळाली आहे. एरवी जुहू समुद्र किनाऱ्याच्या देखभालीसाठी महानगरपालिकेकडून २ बीच क्लिनिंग मशिन्स, २ बॉबकॅट्स, १० डंपर्स, १ जेसीबी आणि दोन सत्रांमध्ये कार्यरत १५० स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आलेले असतात. या यंत्रणेद्वारे दररोज साधारण ६० मेट्रिक टन कचरा जमा केला जातो. मात्र यंदाच्या पावसाळ्यात कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याने महानगरपालिकेने नेहमीच्या यंत्रणेसोबत अतिरिक्त स्वरुपात १ बीच क्लिनिंग मशिन, २ बॉबकॅट्स, ५ डंपर्स, १ जेसीबी, २ ट्रॅक्टर ट्रॉली, २ पोकलेन मशिन्स तसेच दोन सत्रांमध्ये कार्यरत ९० अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी तैनात केले आहेत. त्यामुळे कचरा हटविण्याच्या कामाला अधिक वेग मिळाला आहे.
https://prahaar.in/2026/07/15/co-chairpersons-appointed-for-the-chief-minister-baliraja-farm-access-road-scheme-across-91-assembly-constituencies-decision-by-revenue-minister-bawankule/
सध्या जुहू समुद्रकिनारा स्वच्छतेचे काम यंत्र आणि मनुष्यबळाचा वापर करून अखंडपणे सुरू आहे. या मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करण्यात आलेला कचरा तत्काळ शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी आणि विल्हेवाटीसाठी पाठविण्यात येत आहे. यासोबतच समुद्राला येणाऱ्या भरतीमुळे मोठ्या प्रमाणात कचरा पुन्हा किनाऱ्यावर जमा होत असल्याने तो हटविण्यासाठी स्वच्छता मोहिमेस बळ देण्यात येत आहे.
नागरिकांना आवाहन
मुंबईतील नागरिक तसेच समुद्र किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांनी या स्वच्छता मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. समुद्र किनारा किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे विशेषतः पावसाळ्यात नाले आणि जलवाहिन्यांमध्ये कचरा जाणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. मुंबईचे समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी आणि मुंबईच्या सागरी पर्यावरणाचे तसेच भावी पिढ्यांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आवाहन उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी केले आहे.