Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. पारनेर नगरपंचायतीचे भाजप नगरसेवक अशोक फुलाजी चेडे (Ashok Fulaji Chede) यांचे भरदिवसा फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आले. मात्र, अपहरणकर्त्यांची एक चूक त्यांच्या जीवावर बेतणारी ठरली असती कारण त्यांना ज्या व्यक्तीचे अपहरण करायचे होते, ती व्यक्ती चेडे नसल्याचे समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि आरोपींनी त्यांची सुटका केली. मात्र, त्याआधी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील अंगठ्या असा तब्बल सात तोळे सोन्याचा लंपास करत आरोपी पसार झाले.
https://prahaar.in/2026/07/15/more-horrific-than-a-movie-first-the-hand-was-severed-and-then-repeated-blows-were-struck-with-a-sickle/
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सेवा संस्थांचे ठराव गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी, १२ जुलै रोजी अशोक चेडे (Ashok Chede) हे चाकण येथील काम आटोपून आपल्या चालकासह कारने पारनेरकडे (Parner) निघाले दरम्यान, सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांची कार अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील (Ahilyanagar-Kalyan highway) कर्जुले हर्या शिवारात पोहोचली. त्याचवेळी एक अनपेक्षित प्रसंग घडला. एका लाल रंगाच्या स्विफ्ट कारने त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करत अचानक त्यांच्या चारचाकीसमोर वाहन आडवे उभे केले. तर काही क्षणातच दुसरी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कारही त्यांच्या वाहनाशेजारी येऊन थांबली.
https://prahaar.in/2026/07/15/nashik-gang-of-9-fake-officers-finally-arrested/
नगरसेवकाचेच अपहरण
क्षणांतच दोन्ही वाहनांतून सात ते आठ जण खाली उतरले. त्यांनी चालक आणि अशोक चेडे यांना मारहाण केली. त्यानंतर चेडे यांना जबरदस्तीने एका कारमध्ये बसवून मांडओहळ धरणाच्या दिशेने नेण्यात आले. धरणाजवळ पोहोचल्यानंतर चेडे यांनी अपहरणकर्त्यांना मला का पळवून आणले, असे विचारले असता आरोपींनी, तुम्ही सेवा संस्थेचे संचालक आहात, म्हणून आम्ही तुम्हाला घेऊन आलो, असे सांगितले. मात्र, चौकशीदरम्यान त्यांना अशोक चेडे हे संबंधित संस्थेचे संचालक नसून पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक असल्याचे लक्षात आले.
आपण चुकीच्या व्यक्तीचे अपहरण केल्याचे समजताच आरोपींनी चेडे यांची सुटका केली. मात्र, त्याआधी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील अंगठ्या असा सुमारे सात तोळे सोन्याचा ऐवज हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पसार झाले. सुटका झाल्यानंतर या प्रकरणी अशोक चेडे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात (Parner Police Station) तक्रार दाखल केली असून, अज्ञात सात ते आठ जणांविरोधात अपहरण, मारहाण आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक रणजित मारग करत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, निवडणूक प्रक्रियेदरम्यान वाढत्या गुन्हेगारीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
https://prahaar.in/2026/07/15/another-shocking-video-has-surfaced-of-hooligans-attacking-tourists/
आठ दिवसांत अपहरणाच्या तीन घटना
दरम्यान, जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी (District Cooperative Bank) विविध कार्यकारी सेवा संस्थांचे ठराव प्रक्रिया सुरू आहे. या ठरावादरम्यान तालुक्यातील लोणी हवेली, पाडळी जणगाव येथेही अपहरणाचे प्रकार घडले आहेत. चेडे यांचीही तिसरी घटना आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत दबावतंत्राचा वापर होत आहे का, असा सवाल उपस्थित होत असून, या घटनांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.