समृध्दी महामार्गावर पत्नीची हत्या करून आरोपी पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात
वाशिम : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूरहून (Nagpur) मुंबईकडे जात असताना एका व्यक्तीने चालत्या कारमध्ये पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पत्नीचा मृतदेह कारमध्येच ठेवून तो अनेक किलोमीटर प्रवास करत वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहर पोलीस ठाण्यात पोहोचला आणि स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिली.
https://prahaar.in/2026/07/14/5-year-old-girl-kidnapped-and-murdered-in-raigad-suspect-taken-into-custody/
प्राथमिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथील सलमान खान नेक खान (वय 30) हा पत्नी हसीना बानो (वय 28) आणि त्यांच्या तीन लहान मुलांसह बलेनो कारने प्रवास करत होता. नागपूरवरून समृद्धी महामार्गाने मुंबईकडे जात असताना पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, वाद विकोपाला गेल्यानंतर सलमानने पत्नीवर हल्ला केला आणि तिचा गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेवेळी कारमध्ये त्यांची तीन लहान मुलेही उपस्थित होती.
हत्येनंतर आरोपीने पत्नीचा मृतदेह कारमध्येच ठेवून प्रवास सुरू ठेवला आणि थेट कारंजा शहर पोलीस ठाण्यात जाऊन, “मी पत्नीचा खून केला आहे,” अशी माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत मृतदेह कारमधून बाहेर काढला. हत्या समृद्धी महामार्गावरील नेमक्या कोणत्या ठिकाणी झाली आणि त्यामागील कारण काय होते, याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणी कारंजा शहर पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत असून, आरोपीची चौकशी सुरू आहे.