कनकन किंडी

0
कनकन किंडी

भारतीय ऋषी-डॉ. अनुराधा कुलकर्णी

कर्नाटकातील एक आचार्य व्यासराय यांचा शिष्यपरिवार खूपच मोठा होता. वेदउपनिषदांचे सखोल अध्ययन ते आपल्या शिष्यांकडून करवून घेत. एकदा आपल्या शिष्यांची परीक्षा पाहण्याकरिता व्यासरायांनी प्रत्येक शिष्याला एकेक केळे दिले आणि ते कोणीही पाहात नसताना खाण्यास सांगितले. सारे शिष्य कुठे कुठे एकांतात जाऊन केळे खाऊन परतले. पण एक शिष्य मात्र हातात केळे तसेच घेऊन परतला आणि म्हणाला, “गुरूदेव, मी कोठेही गेलो तरी सर्वत्र भरलेला परमेश्वर मला पाहातच होता!” त्याचे उत्तर ऐकून गुरुजींना फार आनंद वाटला. त्यांच्या संपूर्ण शिष्यपरिवारात हा एकच शिष्य उत्तीर्ण झाला होता! त्याचे नाव कनकदास.

कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील बाड या गावी बच्चमा व बीरप्पा या दांपत्याने पुत्रप्राप्तीसाठी अनेक व्रतवैकल्य केली, पण त्याचे फळ मिळाले नाही. एकदा स्वप्नात त्यांना तिरुपतीचे भगवान वेंकटेश्वर आपल्याला बोलावित आहेत, असे दिसले. तेव्हा एका महिन्याची पायी तिरुपतीची खडतर यात्रा करून या दांपत्याने वेंकटेश्वराचे दर्शन घेतले. तेथेही त्यांनी अठ्ठेचाळीस दिवस पूजाअर्चा, ध्यानधारणेत घालविले. त्याचे त्यांना फळ मिळाले. त्यांच्या पोटी कनकदासांचा जन्म झाला. त्यांचे जन्मनाव थिमप्पा होते. थिमप्पा विजयनगर साम्राज्यातले एक पराक्रमी सैनिक आणि दुर्गरक्षक होते. एका भीषण युद्धात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत ग्लानीत असताना त्यांच्या नजरेसमोर श्रीहरीची मूर्ती तरळत होती. त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर विलसणाऱ्या मधुर हास्यात आपल्या सर्व शारीर वेदना शांत झाल्यासारखे थिमप्पांना जाणवले. त्यानंतर शुद्धीवर आलेल्या थिमप्पांना आयुष्याचा नवा भक्तिमार्ग गवसला. त्यांनी शस्त्र सोडून हातात चिपळ्या आणि एकतारी घेतली. हरिनामजप करीत भ्रमण करू लागले. भ्रमण करता करता स्वरचित हरिभजनात रंगून गेले. सोळाव्या शतकातील ते महान संत कवी झाले. त्यांची दोनशे संकीर्तने उपलब्ध आहेत. ही संकीर्तने रागबद्ध व रसपूर्ण असल्याने कर्नाटकात अत्यंत लोकप्रिय व आबालवृद्धांच्या तोंडी आहेत.

उपजतच पूर्ण विरागी असलेल्या थिमप्पांना एके दिवशी आपल्या शेतात खोदकाम करीत असता सोन्याच्या मोहरांनी भरलेले सात हंडे सापडले. या संपूर्ण धनाचा स्वतःसाठी यत्किंचितही वापर न करता थिमप्पांनी ते समाजकल्याणास्तव वापरले. सोने सापडले म्हणून ते ‘कनक’ आणि दासकूट परंपरेतले म्हणून ‘कनकदास’ या नावाने ते सुप्रसिद्ध झाले.कर्नाटकातील वैष्णव संप्रदायात दासकूट व व्यासकूट अशा दोन परंपरा होत्या. ज्यांनी अनन्य भक्तीचा मार्ग धरून आपले अवघे जीवन प्रभुसेवेला वाहून दिले, ते दासकूट परंपरेतले आणि ज्यांनी अध्यात्मज्ञानाची कास धरून लोकांसमोर ज्ञानग्रंथ विशद केले, ते व्यासकूट परंपरेतील होत. कनकदासांनी युद्धशास्त्र, प्रशासन, धर्मशास्त्र, व्याकरण, अध्यात्मशास्त्र या सर्वांचे सखोल अध्ययन केले होते. मात्र त्यांची प्रवृत्ती केवळ भक्तिमार्गाकडे होती. त्यांनी मोहनतारांगणी, नलचरित्र, हरिसार, रामधान्यचरित्र इ. ग्रंथलेखन केले आहे. अशा या विद्वान भक्ताला, तो केवळ कनिष्ठ जातीत जन्मला म्हणून उडुपी येथील कृष्णमंदिरात प्रवेश नाकारला गेला होता. तेव्हा खिन्न मनाने कनकदास मंदिराच्या मागील बाजूस आले आणि तेथेच देवापाशी धरणे धरल्यासारखे बसून राहिले! मंदिराच्या मूर्तीचे दर्शन जरी त्यांना लाभले नव्हते तरी त्यांच्या मनःचक्षुसमोर कृष्णचरित्रातील कृष्णाची विविध लोभसवाणी रूपे येऊ लागली. लोण्यासाठी मातेपाशी हट्ट करणारा कृष्ण, तिच्याकडून स्वतःला बांधून घेणारा कृष्ण, पुतनेचे शोषण करणारा, गोवर्धन पर्वत उचलणारा, रासक्रीडा करणारा मनोहर कृष्ण, अर्जुनाला गीता सांगणारा धीरोदात्त कृष्ण. ही सर्व कृष्णरूपे जणू चलचित्रासारखी कनकदासांच्या नजरेसमोर साकारत होती! त्यामुळे त्यांची खिन्नता पार पळाली आणि ते हर्षनिर्भर होऊन कृष्णाच्या गुणसंकीर्तनाचे गीत
आळवू लागले.

त्यांच्या कृष्णकाव्याचा भावानुवाद – रुणझुण रुणझुण असा मंजुळ नाद करणारी पैंजण घातलेल्या कृष्णा, सुंदर नीलमणी ज्यात जडवलेला आहे असे बाहुभूषण घातलेल्या मोहना, नीलकमलासमान शोभणाऱ्या गोविंदा, माझ्या सामोरी ये, तुझा पिवळा पितांबर माझ्या डोळ्यांसमोर झगमगतोय, तू लावलेल्या चंदनाच्या उटीचा सुगंध दरवळतोय, माझ्या अगदी निकट असल्यासारखा तू मला जाणवतोय, आता प्रत्यक्ष दर्शन दे, तूच माझे आराध्य दैवत ‘कागिनेलेयादिकेशव‘ आहेस, तुला बघायला माझे अगदी नेत्र व्याकुळ झाले आहेत, माझ्या कान्हा रे तू धावत ये…कनकदासांच्या गीतातील विलक्षण मधुरता आणि अत्युत्कट भावाचा मोह मंदिरातल्या देवालाही पडला आणि पूर्वाभिमूख असलेली कृष्णमूर्ती पश्चिमाभिमुख झाली. आणि तेथे असलेल्या खिडकीतून कनकदासाला दर्शन देती झाली! सर्वांना कनकदासाची थोरवी कळून चुकली. आजही त्या मंदिरात ती खिडकी ‘कनकन किंडी’ या नावाने आपणास दिसते.आपल्या शंभर वर्षांच्या आयुष्यात कनकदासांनी कर्नाटकात भक्तीची उज्ज्वल परंपरा निर्माण केली. कनकदास आपल्या काव्यातून सामाजिक विषमतेवरही प्रहार केला आहे. “भांडू नका रे म्हणत कुळ कुळ । काय तुम्ही जाणता तुमच्या कुळाचे मूळ?” अशा अर्थाचे त्यांचे सुप्रसिद्ध काव्य आहे. ते म्हणतात, “ या निसर्गात असलेले पाणी, हवा, पृथ्वी सर्वांसाठी एकच आहे. तेव्हा ‘मी मोठा, तू छोटा’ हा अहंकार का धरता? कमलपत्रावरील पाण्याच्या थेंबासारखा किंवा बुडबुड्यासारखा हा मानवी देह क्षणभंगूर आहे. सर्व व्यापून उरलेला तो श्रीहरीच शाश्वत सत्य आहे. हे ओळखून भगवंताच्या चरणकमलाची मनोभावे भक्ती करणाराच खऱ्या अर्थाने उच्च कुळाचा आहे.”

कनकदासांच्या ‘रामधान्य चरित्र’ या लोकप्रिय रूपकात्मक काव्यात, श्रीमंतीचे प्रतीक असलेला तांदळाचा अहंकार आणि कष्टकऱ्यांचे प्रतीक असलेली नाचणी यांचा संवाद आहे. अखेर प्रभू रामचंद्र नाचणीचा टिकावुपणा आणि नम्रता पाहून तिला ‘राघवन’ म्हणून गौरवितात. गोकुळातल्या बालकृष्णाचे कौतुकही यांच्या या रागदारी पदांमध्ये आहे. साऱ्या विश्वाला मोहून टाकणारे हे परब्रह्माचे सगुण रूप यशोदेच्या घरी खेळत आहे. असे यशोदेचे भाग्य वर्णिताना श्रीकनकदास म्हणतात,पोडविय ईरडि माडिद देवन कुडिबेरलने करदलि पिडिदु अडियिड्डु मगने मेल्लडियिड्डु एनुतलि नडेगजिसुव पुण्यवेत पडे दळय्या “ज्याच्या दोन पावलात सगळी भूमी सामावते, त्याला “हळूच पाय टाक” म्हणत सांभाळण्याचे पुण्य यशोदेला कसे मिळाले असेल!” कनकदासांचे ‘मोहनतरंगिणी’ नावाचे सुरेख सूरतालाने सजलेले महाकाव्य आहे. यात कनकदास आपल्या पत्नीला पौराणिक कथा ऐकवत आहेत. शृंगाररस आणि भक्तिरस यांचा या काव्यात मनोरम संगम आहे. श्रीकृष्ण-रुक्मिणी, प्रद्युम्न-रती, अनिरुद्ध-उषा या तीन दैवी पिढ्यांच्या कथा यात आहेत.कनकदासांच्या सर्वच काव्यरचना सुप्रसिद्ध आहेत. ते अतिशय विनम्रतेनेने परमेश्वराला आळवितात “!हे भगवंता, मी वेद, शास्त्र पुराणे यांचे थोडेही मर्म जाणत नाही, मी कुठल्याही विवादात, तर्कमीमांसेत पडू इच्छित नाही, मी मंदबुद्धी आहे. हे परमेश्वरा, माझ्या हृदयाच्या अंगणात ज्ञानाचा प्रकाश पडो, तू माझ्या विकाररूपी संकटांपासून मला वाचव.”

एकदा कनकदासांच्या शिष्याने त्यांना विचारले की, “मी परमात्म्याला प्राप्त करू शकतो का? ’’ कनकदासांनी उत्तर दिले, “अवश्य! फक्त त्यासाठी ‘मी’ गेला पाहिजे..’’ शिष्याने विचारले, “हा ‘मी’ कोण आहे? आणि तो कसा जाईल? ’’ कनकदास उत्तरले, “ ‘मी’ चा अर्थ मोह, अहंकार होय. जोपर्यंत ‘मी’ ‘माझे’ किंवा ‘मी आहे’ यातील अहंकार जात नाही तोपर्यंत आपण परमात्म्याला प्राप्त करू शकत नाही. हा अहंकार द्वैतभावामुळे येतो. ‘दुसरा’ कोणीच नसेल तर आपण कोणासमोर आपला टेंभा मिरविणार? संतांसाठी कोणीच दुसरा किंवा परका नसतो. म्हणून ते परमात्म्याशी सहजपणे एकरूप होऊ शकतात. परमेश्वराला शरण जाणे म्हणजेच आपला जगापासून स्वतःला अलग समजणारा अहंकार विसर्जित करणे होय ’’ असे कनकदासांचे उदात्त विचार होते. त्यांचे ते तत्त्वगर्भ असूनही साधे सरल काव्य होते. अशा या महान संत कनकदासांना भक्तिपूर्ण प्रणाम…!! anuradh.klkrn@gmil.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here