Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra rain update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; पालघर, रायगडला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

Maharashtra rain update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; पालघर, रायगडला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

0
Maharashtra rain update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; पालघर, रायगडला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट
heavy rain

मुंबई : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत अतिवृष्टीची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Rain)

कोकण विभागात पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाने म्हटले आहे. (IMD Alert)

https://prahaar.in/2026/07/07/likely-release-of-water-from-palkhed-dam-alert-issued-to-residents-along-the-banks-of-the-kadva-river/

पश्चिम महाराष्ट्रात पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, तर नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांतील नद्या आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सखल भागांमध्ये सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विदर्भात अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

https://prahaar.in/2026/07/07/pravin-darekar-urges-gadkari-regarding-the-dapoli-poladpur-mahabaleshwar-national-highway/

मराठवाड्यात सध्या कोणताही विशेष अलर्ट नसला तरी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. काही भागांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून मुंबईत खासगी कार्यालयांना शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here