Home संपादकीय विशेष लेख खाद्यसंस्कृतीचा जागतिक दस्तावेज

खाद्यसंस्कृतीचा जागतिक दस्तावेज

0
खाद्यसंस्कृतीचा जागतिक दस्तावेज

नोेंद- अनिता बागवे

छायाचित्र म्हणजे केवळ दृश्य नोंद नाही; ती एक कथा असते, हे सिद्ध करणारी ‘वर्ल्ड फूड फोटोग्राफी अॅवॉर्ड्स २०२६’ ही स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत ५० हून अधिक देशांमधून तब्बल ९ हजार छायाचित्रांची नोंद झाली. त्यातून हेच जाणवले की, प्रत्येक ताटामागे एक कुटुंब, प्रत्येक पिकामागे शेतकऱ्याचा घाम आणि प्रत्येक जेवणामागे संस्कृतीचा वारसा दडलेला असतो.

 

मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगायचा झाला, तर तो अन्नाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. भाकरीच्या शोधापासून ते पंचतारांकित खाद्यसंस्कृतीपर्यंतचा प्रवास हा केवळ चवीचा नसून संस्कृती, परंपरा, श्रम, नाती आणि मानवी अस्तित्वाचा इतिहास आहे. म्हणूनच एखाद्या समाजाची ओळख त्याच्या भाषेत, वेशभूषेत किंवा कलेइतकीच त्याच्या अन्नसंस्कृतीतही दडलेली असते.

याच मानवी अनुभवांचा आणि खाद्यसंस्कृतीचा विलक्षण पट उलगडणारी ‘वर्ल्ड फूड फोटोग्राफी अॅवॉर्ड्स २०२६’ ही स्पर्धा यंदाही जगभरातील रसिकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. सोव्हिएत काळातील ऐतिहासिक आरोग्य केंद्रातील शांत भोजनगृहापासून ते बांगलादेशातील गजबजलेल्या बाजारपेठेपर्यंत, शेतातील कष्टापासून ते घरगुती स्वयंपाकघरातील आत्मीयतेपर्यंत आणि रस्त्यावरील खाद्यसंस्कृतीपासून ते सण-उत्सवांतील सामूहिक जेवणापर्यंत—या स्पर्धेतील प्रत्येक छायाचित्र अन्नाच्या माध्यमातून मानवी जीवनाची वेगळी कहाणी सांगते.

‘टेंडरस्टेम® बिमी® ब्रोकोलिनी’च्या प्रायोजकत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या २०२६ च्या स्पर्धेत ५० हून अधिक देशांमधून तब्बल ९ हजार छायाचित्रांची नोंद झाली. या छायाचित्रांमध्ये शेतातील पिकांची कापणी, मासेमारी, स्थानिक बाजारपेठा, कौटुंबिक स्वयंपाकघर, स्ट्रीट फूड, पारंपरिक सण-उत्सव आणि उपजीविकेसाठीचा संघर्ष यांचे अस्सल चित्रण करण्यात आले आहे. या स्पर्धेची खरी ताकद तिच्या विषय वैविध्यात आहे. येथे केवळ आकर्षक खाद्यपदार्थांचे छायाचित्रण नाही, तर अन्न माणसाच्या आयुष्याला, संस्कृतीला आणि समाजव्यवस्थेला कशा प्रकारे आकार देते, याचा दृश्यात्मक दस्तऐवज साकारला जातो. ए

का कॅमेऱ्याच्या क्लिकमधून जगभरातील लोक काय खातात, एवढेच नव्हे तर ते अन्न कुठून येते, कोणाच्या श्रमातून तयार होते आणि त्यांच्या दैनंदिन आयुष्याशी कसे जोडलेले आहे, याचाही प्रभावी वेध या छायाचित्रांमधून घेतला जातो.
यंदाचा सर्वोच्च पुरस्कार ब्रिटनच्या छायाचित्रकार जो किर्नी यांच्या “A Woman Eats in the Canteen of the Soviet-era Sanatorium” या छायाचित्राला मिळाला. या छायाचित्रात एका वृद्ध महिलेचा साधा जेवणाचा क्षण टिपण्यात आला आहे. कोणताही कृत्रिम देखावा नाही, भव्य मांडणी नाही; तरीही प्रकाश, रंग आणि त्या महिलेच्या शांत, सन्मानपूर्ण उपस्थितीमुळे हे छायाचित्र मानवी प्रतिष्ठेचा आणि साधेपणातील सौंदर्याचा प्रभावी दस्तावेज बनते. या स्पर्धेतील विजेती आणि अंतिम फेरीतील छायाचित्रे पाहिली, तर अन्न हे केवळ ताटापुरते मर्यादित राहत नाही. कुठे ग्वाटेमालातील रस्त्यावर अननस विकणारा विक्रेता दिसतो, तर कुठे न्यूयॉर्कमधील शहरी शेतीत लेमनग्रासची कापणी करणारे शेतकरी. कोलंबियातील बाजारपेठेतील गजबज, उझबेकिस्तानमधील तंदूरमधून बाहेर आलेल्या गरम भाकरीला स्पर्श करणारे बालपण किंवा घरगुती स्वयंपाकातील साधे क्षण – प्रत्येक छायाचित्र अन्नाच्या माध्यमातून समाज, श्रम आणि संस्कृतीचे वेगळे रूप उलगडते.

‘वर्ल्ड फूड फोटोग्राफी अॅवॉर्ड्स’ची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे येथे फक्त सुंदर पदार्थांचे छायाचित्रण महत्त्वाचे नसते. अन्न उत्पादन, शेती, मासेमारी, स्वयंपाक, भोजन, सण-उत्सव, रस्त्यावरील खाद्यसंस्कृती, रेस्टॉरंटमधील जीवन, मोबाइल फोटोग्राफी, नवोदित छायाचित्रकार अशा अनेक विभागांमध्ये पुरस्कार दिले जातात. त्यामुळे ही स्पर्धा खाद्यसंस्कृतीचा व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक पट मांडते.

आज सोशल मीडियाच्या युगात अन्नाचे छायाचित्र म्हणजे आकर्षक सादरीकरण, अशी सामान्य धारणा आहे. मात्र या स्पर्धेतील छायाचित्रे त्या चौकटीपलीकडे जातात. ती शेतीतील कष्ट, हवामानाचा परिणाम, अन्नसुरक्षा, परंपरा, कुटुंब, स्थलांतर आणि मानवी जगण्याशी अन्नाचे असलेले नाते अधोरेखित करतात. त्यामुळे ही स्पर्धा केवळ कलात्मक नसून सांस्कृतिक आणि सामाजिक दस्तऐवजीकरणाचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरते. म्हणूनच तर “फोटोग्राफी म्हणजे क्षण गोठवण्याची कला आहे, जी आयुष्यभर आठवणीत राहते.” असे म्हणतात. या स्पर्धेत जगातील कोणत्याही देशातील व्यावसायिक तसेच हौशी छायाचित्रकार सहभागी होऊ शकतात. भारतासारख्या समृद्ध खाद्यपरंपरा असलेल्या देशासाठी ही स्पर्धा विशेष महत्त्वाची आहे. आपल्या गावातील भाकरी, शेतातील कापणी, मच्छीमारांचे जीवन, आदिवासी खाद्यसंस्कृती, पारंपरिक बाजारपेठा किंवा सणावारातील जेवण यांसारखे विषयही जागतिक पातळीवर तितकेच प्रभावी ठरू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here