Home संपादकीय जनसंवाद

जनसंवाद

0
जनसंवाद

सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा

आरोग्यमंत्र्यांनी सोनोग्राफी केंद्रांमधील गैरप्रकार आणि गर्भलिंग निदान रोखण्यासाठी ‘मकोका’सारख्या कडक कारवाईची केलेली घोषणा नक्कीच स्वागतार्ह आहे. यामुळे कायद्याचा वचक बसेल. सध्या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या रुग्णालयांत सोनोग्राफीचे दर हजार ते पाच हजारांपर्यंत कितीही आकारले जातात. सरकारने यासाठी एक निश्चित कमाल मर्यादा ठरवून देणे गरजेचे आहे, जेणेकरून सामान्यांना ते परवडेल. प्रत्येक सोनोग्राफी आणि आयव्हीएफ केंद्राबाहेर अधिकृत दरांचा फलक लावणे बंधनकारक केले पाहिजे. आरोग्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे खाटांच्या उपलब्धतेसाठी डॅशबोर्ड तयार करण्याची घोषणा केली आहे, त्याच धर्तीवर शासकीय आणि मान्यताप्राप्त खासगी केंद्रांमधील चाचण्यांचे अधिकृत दरही जनतेला ऑनलाईन दिसण्याची व्यवस्था व्हायला हवी. गैरप्रकार रोखतानाच, आरोग्य सेवा सामान्यांच्या खिशाला परवडणारी करणे हेच खऱ्या अर्थाने या कृतिदलाचे मोठे यश असेल ! – चंद्रशेखर दाभोळकर, मुंबई

मॅनहोल कामात हलगर्जीपणा नको

मुंबईत साकीनाका कुर्ला येथे मेनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा जीव गेला आहे. महापालिका प्रशासन तसेच महाराष्ट्र शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदर अपघाताची लगेचच चौकशी सुरू केली असून संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. संबंधित चार जणांचे निलंबन केले आहे. दुसरीकडे विरोधकांनी पालिका आयुक्त आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा राजीनामा मागितला आहे. विशेष म्हणजे कुठलाही जाती-धर्म, भेदभाव न करता अतिशय जलद गतीने कारवाई केली आहे. वास्तविक पावसाचे दिवस आहेत, पाण्याचा निचरा होण्यासाठी आणि मॅनहोलवर संरक्षक जाळी बसवण्याचे काम करण्यासाठी मॅनहोल उघडून ठेवले जातात. दुर्दैवाने मोबाईलवर बोलत जाणारी एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली. त्याठिकाणी कंत्राटदराची दोन माणसे काम करताना दिसत आहेत. पण पालिका कामगारांचीही उपस्थित गरजेची होती. मॅनहोलमध्ये याआधीही असे अपघात होऊन मनुष्य जीव आपण गमवले आहेत.- संजय साळगांवकर, मुंबई

संगीत पुरस्काराचे स्वरूप

महाराष्ट्र शासनाने आशाताई भोसलेंच्या नावाने संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार’ सुरू करण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह, असाच आहे; परंतु महाराष्ट्रात आधीच गायन आणि संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ सातत्यपूर्ण सेवा देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यासाठी ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ दिला जातो. त्यामुळे आशाताईंच्या नावाने संगीत गौरव पुरस्कार देताना या पुरस्काराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी या पुरस्काराचे स्वरूप आणि निकष काहीसे वेगळे असावेत, असे वाटते. लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन्ही भगिनींनी केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे नाव जगभरात रोशन केले आहे. लतादीदींचा सोज्वळ दैवी स्वर आणि आशाताईंच्या गायकीतील अष्टपैलित्व आणि अफाट वैविध्य या दोन्ही काहीशा भिन्न गोष्टी आहेत. मात्र दोघीनींही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने जगभरातील संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आशाताईंनी केवळ शास्त्रीय, नाट्य किंवा सुगम संगीतच नाही, तर पॉप, कॅबरे, गझल अशा वैविध्यपूर्ण गायनाने संगीत जगताला समृद्ध केले आहे. त्यांच्या या अष्टपैलू गायकीचा सन्मान करण्यासाठी या पुरस्काराचे नाव ‘संगीत क्षेत्रातील नावीन्य आणि प्रयोगशीलता पुरस्कार’ अशा आशयाचे असावे, असे वाटते. – प्रदीप मोरे, मुंबई

परिस्थितीत सुधारणा आवश्यक

पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून कुणी मृत्युमुखी पडले की मॅनहोलवर जाळ्या बसविण्याचा मुद्दा ओसंडून वाहतो आणि लगेच पुराच्या पाण्याबरोबर ओसरूनही जातो. बसविलेली झाकणे, जाळ्या चोरल्या जातात ही सबब आणि त्या बसवण्याच्या बाबतीत होणारी चालढकल, दिरंगाई अत्यंत संतापजनक आहे. उच्च न्यायालयाने अनेकदा तंबी देऊनही संरक्षक जाळ्या बसविण्याचे तातडीचे काम दरवर्षी प्रमाणे कासवाच्या गतीने सुरू आहे. लाखाच्यावर मॅनहोल असताना फक्त साडेचार हजार मॅनहोल जाळीयुक्त आहेत, यावरून महापालिकेची अनास्था दिसून येते. अजून किती जणांचे बळी घेतल्यानंतर परिस्थितीत सुधारणा करण्याचे गांभीर्याने घेतले जाईल?- हेमंतकुमार मेस्त्री, मनोर

रामनामाचा जप

प्रभू श्रीराम यांचे अयोध्येतील मंदिर न्यायालयाच्या अनेक वर्षांच्या निर्णयाचे प्रतीक आहे. त्यासाठी किती गेले, किती आले, कित्येकांना प्राण गमवावे लागले, याचा हिशोबच नाही. पण एक नक्की रामनामाशिवाय गत्यंतर नाही. महात्मा गांधीसुद्धा मृत्यूसमयी ‘हे राम’ म्हणाले होते, असे वाचनात आले. संकटसमयी रामालाच साद घातली जाते, अंत्ययात्रेतही ‘श्रीराम जयराम जयजयराम’ या नावाचा घोष चालू असतो. अनेक निवडणुकासुद्धा श्रीराम मंदिराच्या मुद्द्यावरच विजयाला पात्र ठरल्या. मंदिराची पहिली वीट मी बसविणार म्हणणारे थोडे मागे पडले आणि त्यांनाही श्रीरामांनी मागे टाकले. आतातर हातातून सर्वच गेल्यावर राममंदिरात पैशांचा घोटाळा झाला हे ऐकून त्याच्याच नावावर मोर्चे काढण्याची तयारी सुरू झाली, पण अशाने राम भेटणार का? म्हणजेच श्रीरामांशिवाय आपणाला मार्ग मिळत नाही असे समजल्यावर जणू काही रामाचा धावा करून स्वतःच मी रामाचा भक्त असल्याचा निर्वाळा देऊ लागले. पण अजूनही आपल्या जीवनातला राम समजू शकला नाही. – अमोल करकरे, खेड-रत्नागिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here