Home साप्ताहिक रिलॅक्स ‘बाईंची शाळा’: एक आठवण

‘बाईंची शाळा’: एक आठवण

0
‘बाईंची शाळा’: एक आठवण

मराठी रंगभूमीवर ‘बाई’ या संबोधनाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी या आठवड्यात आयुष्याच्या रंगमंचावरून ‘एक्झिट’ घेतली आणि रंगभूमीवरचे एक पर्व काळाच्या पडद्याआड गेले. बाईंनी रंगकर्मी या नात्याने रंगभूमी गाजवलीच; पण त्याचबरोबर त्यांच्या रूपाने एक विद्यापीठ म्हणून त्यांचे स्थान नाट्यसृष्टीत निर्माण झाले. त्यांची एक आठवण म्हणजे दहा वर्षांपूर्वी बाईंनी चक्क कलावंतांची ‘शाळा’ घेतली होती. पण हे करताना, ‘मी कार्यशाळा घेत असले तरी मी शिक्षिका नाही, तर आजही विद्यार्थिनीच आहे’, असे सांगत त्यांची त्याविषयीची भूमिकाही स्पष्ट केली होती.

बाईंच्या ‘स्कूल’चे धडे गिरवलेले विक्रम गोखले, नाना पाटेकर, सुहास जोशी, नीना कुलकर्णी, भारती आचरेकर, प्रतिमा कुलकर्णी आदी ज्येष्ठ रंगकर्मींपासून; नव्या पिढीतल्या अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी यांच्यापर्यंतच्या आघाडीच्या कलाकारांची शाळा ‘बाई’ घेणार, हा तेव्हा औत्सुक्याचा विषय ठरला होता. ही शाळा घेण्यामागचे कारण स्पष्ट करताना बाईंनी मांडलेली भूमिका महत्त्वाची होती. त्या म्हणाल्या होत्या, “काळाच्या ओघात रंगभूमीवरची स्थिती बदलली आहे. रंगभूमीवर सध्या जे काम करत आहेत, ते माझ्या नातवंडांच्या वयाचे आहेत. कलेविषयी माझ्या असलेल्या श्रद्धा, त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात असे वाटते, म्हणून ही कार्यशाळा”. या शाळेच्या निमित्ताने, नाट्यक्षेत्रात कारकिर्दीच्या मध्यावर असलेल्या रंगकर्मींना नवे धडे देण्यास ‘बाई’ नव्याने सरसावल्या होत्या आणि मराठी नाट्यसृष्टीत त्यावेळी ही महत्त्वाची घटना ठरली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here