Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela : पुढील वर्षी होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने स्वच्छतेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आराखडा तयार केला आहे. लाखो नव्हे तर कोट्यवधी भाविकांच्या गर्दीचा विचार करून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. तब्बल ५६ हजार तात्पुरती स्वच्छतागृहे, आठ हजारांहून अधिक सफाई कर्मचारी, दोन हजार वस्त्रांतर कक्ष आणि प्लास्टिकमुक्त कुंभमेळ्याचे लक्ष्य प्रशासनाने निश्चित केले आहे.
https://prahaar.in/2026/06/27/150-special-trains-to-run-from-every-corner-of-the-country-for-simhastha/
स्वच्छतेसाठी मास्टर प्लॅन तयार
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने स्वच्छतेसाठी मोठा मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार कुंभमेळ्याच्या संपूर्ण परिसरात तब्बल ५६ हजार तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. साधूग्राम, रामकुंड आणि इतर घाट परिसर, वाहनतळ, होल्डिंग एरिया, प्रमुख रस्ते तसेच महामार्गालगत ही स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, हा यामागील उद्देश आहे. स्वच्छतेची जबाबदारी पार पाडण्यासाठी आठ हजारांहून अधिक सफाई कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. घाटांची स्वच्छता, रस्त्यांची झाडलोट आणि स्वच्छतागृहांची देखभाल यासाठी विशेष पथके तैनात केली जाणार आहेत. या संपूर्ण यंत्रणेवर माहिती व संपर्क तंत्रज्ञान अर्थात आयसीटी आधारित प्रणालीद्वारे सतत देखरेख ठेवली जाणार आहे. (Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela )
https://prahaar.in/2026/06/26/nashik-fire-brigades-strength-to-be-boosted-ahead-of-simhastha/
दोन हजार वस्त्रांतर कक्ष उभारणार
कचरा व्यवस्थापनासाठीही स्वतंत्र आणि अत्याधुनिक व्यवस्था उभारली जाणार आहे. कुंभक्षेत्रात सुमारे सात हजार कचरापेट्या ठेवण्यात येतील. त्यासाठी नऊ लाखांहून अधिक कचरा पिशव्यांचा वापर केला जाणार असून त्या दिवसातून तीन वेळा बदलल्या जातील. याशिवाय शंभरहून अधिक अतिरिक्त कचरा वाहने, कचरा हस्तांतरण केंद्रे आणि विशेष स्वच्छता पथकेही कार्यरत राहणार आहेत. घाटांवर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेचा विचार करून सुमारे दोन हजार वस्त्रांतर कक्ष उभारण्यात येणार आहेत. महिलांसह सर्व भाविकांना सुरक्षित आणि स्वच्छ सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर आहे.
यंदाचा सिंहस्थ पूर्णपणे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अन्नछत्रे आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये प्लास्टिकऐवजी पत्रावळ, द्रोण आणि कुल्हड यांसारख्या जैवविघटनशील वस्तूंचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर रिव्हर्स व्हेंडिंग मशीन, बॅग व्हेंडिंग मशीन आणि कापडी पिशव्यांचेही वितरण करण्यात येणार आहे. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. नदीतील निर्माल्य, फुले आणि तरंगता कचरा हटविण्यासाठी रिव्हर स्किमर्स, स्वच्छता नौका, फ्लोटिंग बॅरियर्स आणि हँड नेट्सचा वापर केला जाणार आहे. यासाठी घाटांवर स्वतंत्र मनुष्यबळही तैनात केले जाणार आहे. (Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela )
https://prahaar.in/2026/06/24/dedicated-teams-deployed-at-eight-key-locations-for-goda-ghat-security/
स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध देण्याचे उद्दिष्ट
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सिंहस्थ घडविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रणा आणि तांत्रिक व्यवस्था उभारली जात आहे. भाविकांना स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोट्यवधी भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात स्वच्छता हीच सर्वात मोठी परीक्षा असते. यंदा प्रशासनाने ५६ हजार स्वच्छतागृहे, आठ हजार सफाई कर्मचारी, आधुनिक कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकमुक्त कुंभमेळ्याचा आराखडा तयार केला आहे. आता या नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी कितपत होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
कुंभमेळ्याला केवळ धार्मिक नव्हे, तर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची जोड देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. भाविकांच्या सहकार्यामुळेच हा संकल्प प्रत्यक्षात यशस्वी ठरणार आहे.