– सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी
मुंबई : फेसबुकवरील आकर्षक नोकरीच्या जाहिरातींना बळी पडून थायलंडमध्ये गेलेल्या देशातील ४०० हून अधिक अधिक तरुणांना थायलंड–म्यानमार सीमावर्ती भागात बेकायदेशीररीत्या डांबून ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात महाराष्ट्रातील २५ हून अधिक युवकांचा समावेश आहे. या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या प्रकरणाची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, अडकलेल्या तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण मोहिमेची आणि परराष्ट्र मंत्रालयासोबतच्या समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्याकडे सोपवली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत नाशिकमधील पीडित तरुणांशी थेट संवाद साधून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या या तरुणांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून परदेशात नेण्यात आले होते. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर त्यांना म्यानमार सीमेवरील भागात नेऊन डांबण्यात आले. या तरुणांकडून दररोज १६ ते १८ तास ऑनलाइन फसवणुकीची (सायबर गुन्हेगारी) कामे करून घेतली जात आहेत. या बेकायदेशीर कामांना नकार देणाऱ्या तरुणांचा अमानुष छळ केला जात असून, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची अत्यंत भीतीदायक माहिती पीडित तरुणांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला दिली आहे. या तरुणांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे समजताच मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली.
https://prahaar.in/2026/06/30/ensure-immediate-treatment-for-students-involved-in-the-chembur-incident-will-discuss-reservation-sub-categorization-with-the-chief-minister-eknath-shinde/
या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तातडीने गतिमान पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी आणि बँकॉक (थायलंड) येथील भारतीय दूतावासाशी तातडीने संपर्क साधून, अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांची सुरक्षित सुटका करण्यासाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर आणि राजनैतिक कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
कुटुंबीयांनी शासनावर विश्वास ठेवावा – गिरीश महाजन
– “महाराष्ट्र शासन या संवेदनशील प्रकरणावर सातत्याने बारीक लक्ष ठेवून आहे. केंद्र शासन, परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास आणि संबंधित आंतरराष्ट्रीय यंत्रणांच्या सातत्यपूर्ण समन्वयातून अडकलेल्या प्रत्येक तरुणाची सुरक्षित सुटका करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे तरुणांच्या कुटुंबीयांनी कोणतीही भीती न बाळगता शासनावर विश्वास ठेवावा,” असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
https://prahaar.in/2026/06/30/major-relief-for-15010-nhm-contractual-employees-path-cleared-for-regularization-after-over-10-years-of-service/
– दरम्यान, या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या युवकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही जाहिरातींवर आंधळा विश्वास न ठेवता, संबंधित परदेशी कंपनी, एजंट आणि रोजगार प्रक्रियेची शासकीय पातळीवर संपूर्ण पडताळणी करूनच तरुणांनी पुढील निर्णय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.