Nashik : “माझ्या जीवाची आवडी, नेई पंढरपुरा गुढी…” या वैष्णवांच्या जयघोषात साक्षात पांडुरंगाच्या भेटीसाठी संत निवृत्तीनाथ महाराज निघाले आहेत, अशा भक्तीभावाने त्र्यंबकनगरीतील वारकरी आसुसले आहेत. श्री संत निवृत्तीनाथ महाराज (Shri Sant Nivruttinath Maharaj) संस्थान ट्रस्ट मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, २९ जून रोजी दुपारी ठीक दोन वाजता संत निवृत्तीनाथ महाराज (Shri Sant Nivruttinath Maharaj) मंदिरातातून चांदीच्या रथासह या ऐतिहासिक पायी दिंडी सोहळ्याचे आणि पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल.
२५० वर्षांत प्रथमच पालखीचा मार्ग बदलला
त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) सध्या सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे सुरू असल्याने, गेल्या २५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पालखीच्या अंतर्गत मार्गात बदल करण्यात आला आहे. परंपरा ७०० वर्षांची असली, तरी कागदोपत्री नोंद अडीचशे वर्षांची आहे. या नव्या मार्गानुसार पालखी निवृत्तीनाथ महाराज मंदिराकडून हनुमान मंदिर, चौकी माथा, सुंदराबाई मठ या मार्गाने सरळ खाली कदम मार्गाकडे वळेल. तेथून भगवती चौकात रथ थांबेल. त्यानंतर पालखी पायी तीर्थराज कुशावर्त येथे नेण्यात येईल. कुशावर्तावर परंपरेनुसार नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरसेवकांकडून पालखीचे जंगी स्वागत केले जाईल व देवाच्या पादुकांना आणि मूर्तीला पवित्र स्नान व अभिषेक घातला जाईल.
https://prahaar.in/2026/06/29/nashik-tcs-case-major-evidence-emerges-in-the-nashik-conversion-case/
असा असेल पुढील मार्ग आणि पहिला मुक्काम
स्नानानंतर पालखी पुन्हा रथात ठेवून रथ मुख्य मार्गाने मार्गस्थ होईल. हा सोहळा भगवती चौक, बोहर पट्टी, त्र्यंबकेश्वर मंदिर मार्गे श्री संत गजानन महाराज संस्थान आणि तेथून त्र्यंबकेश्वर मुख्य नाक्यावर पोहोचेल. स्थानिक भाविक आणि महिला मोठ्या संख्येने मुख्य नाक्यापर्यंत पालखीला निरोप देण्यासाठी उपस्थित राहतात. पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वरनजीक असलेल्या प्रयाग तीर्थासमोरील ‘श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यात’ असणार आहे.
४० हजार वारकऱ्यांचा जनसागर आणि ५६ दिंड्या
या सोहळ्यात नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लहान-मोठ्या २३ दिंड्या प्रामुख्याने सामील होतात. याशिवाय सिन्नर, अहमदनगर आणि इतर भागांतून मोठ्या प्रमाणावर वारकरी आल्याने एकूण दिंड्यांची संख्या ५६ च्या वर जाते. यंदा सोहळ्यात सुमारे ४० हजारांहून अधिक वारकरी सहभागी होणार असून, पंढरपूरच्या वाटेवर इतर अनेक लहान-मोठ्या दिंड्या यात जोडल्या जातील. या सोहळ्यासाठी नाशिक आणि सिन्नर भागातील प्रमुख दिंडी प्रमुख आणि नामांकित कीर्तनकार त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत.
https://prahaar.in/2026/06/29/a-home-is-not-merely-four-walls-but-a-palace-of-dreams-residents-of-jay-bhavani-society-in-thane-see-their-dream-of-a-home-fulfilled/
प्रशासन आणि पोलिसांची चोख तयारी
पालखीसाठी संत निवृत्तीनाथांचा भव्य चांदीचा रथ आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे. थेट पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्या-त्या जिल्ह्याचे पोलीसा विशेष संरक्षण पुरवणार आहेत. या सोहळ्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, तहसीलदार, स्थानिक पोलीस आणि निवृत्तीनाथ संस्थाना यांच्यात पूर्वतयारी बैठका झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत आरोग्या सेवा, पाणीपुरवठा आणि सामाजिक संस्थांकडून विविध सेवा पुरवल्या जात आहेत. रस्त्याचे काम सुरू असलेल्या भागात पालखीसाठी एका बाजूचा रस्ता पूर्णपणे मोकळा ठेवण्याचे नियोजन प्रशासनाने अंतिम टप्प्यात आणले आहे. पालखी मार्गावरील गावोगावचे नागरिकही वारकऱ्यांच्या भोजन आणि निवासासाठी सज्ज झाले आहेत.