Home साप्ताहिक रिलॅक्स ‘सुभेदारांच्या गेस्ट हाऊस’ची मुंबई वारी…

‘सुभेदारांच्या गेस्ट हाऊस’ची मुंबई वारी…

0
‘सुभेदारांच्या गेस्ट हाऊस’ची मुंबई वारी…

राजरंग-राज चिंचणकर

मराठी रंगभूमीवर सध्या सुरू असलेले ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ हे नाटक, गेले काही दिवस रंगभूमीवरून गायब झाल्याचे मुंबईकर नाट्यरसिकांना जाणवत होते. साहजिकच, या नाटकाची चर्चा मुंबईतल्या नाट्यकट्ट्यांवर रंगली होती. मात्र आता त्यामागचे कारण उघड झाले आहे आणि ते म्हणजे गेले काही दिवस हे नाटक पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, कराड, पुणे आदी ठिकाणी या नाटकाने यशस्वी प्रयोग केल्यानंतर, आता सुभेदारांचे हे गेस्ट हाऊस पुन्हा एकदा मुंबईची वारी करण्यास सज्ज झाले आहे. ‘मर्डर मिस्ट्री’ या लेखन प्रकारात हातखंडा असलेल्या अगाथा ख्रिस्ती यांच्या ‘माऊस ट्रॅप’ या लोकप्रिय नाटकावर ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ हे नाटक आधारित आहे. ‘माऊस ट्रॅप’ या नाटकाने त्याचे मराठीकरण होताना पूर्णतः मराठी बाज स्वीकारला असल्याने, मराठमोळ्या रसिकांना हे नाटक ‘अपील’ होत आहे. या नाटकाचे लेखन शिरीष देखणे आणि या नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे असून, नाटकाला अजित परब यांनी संगीत दिले आहे. शीतल तळपदे यांनी नाटकाची प्रकाशयोजना केली आहे.

महाराष्ट्र दौऱ्याच्या दरम्यान काही ठिकाणी या नाटकाने ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकावला. विशेष म्हणजे, या नाटकात शंतनू मोघे, सौरभ गोखले, अंगद म्हसकर, मृण्मयी गोंधळेकर, विनिता दाते, आनंद पाटील, सना कुलकर्णी, रोहित देशमुख हे सध्याचे आघाडीचे कलावंत आहेत. साहजिकच, पश्चिम महाराष्ट्रातल्या त्यांच्या चाहत्यांनी या नाटकाला उत्तम प्रतिसाद देत, या कलाकारांचा उत्साह वाढवला आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना या नाटकाने रसिकजनांना मनोरंजनाची मेजवानी दिली आहे. ही सगळी भटकंती करून आता हे नाटक पुन्हा एकदा मुंबईत दाखल झाले आहे. दौऱ्यानंतरचा या नाटकाचा मुंबईतला प्रयोग २८ जून रोजी श्री शिवाजी मंदिरात होत आहे. आतापर्यंत अनेक लोकप्रिय नाटके रंगभूमीवर आणणाऱ्या ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने हे नाटक रंगभूमीवर आणले असून, बऱ्याच कालावधीनंतर ही संस्था पुन्हा नाट्यनिर्मितीत उतरली आहे. ‘सुकल्प चित्र’ या संस्थेची त्यांना साथ लाभली आहे. एकूणच, ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ हे नाटक आता मुंबईकर रसिकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here