Home साप्ताहिक श्रध्दा-संस्कृती काश्मिरी स्त्रीसंत लल्लेश्वरी

काश्मिरी स्त्रीसंत लल्लेश्वरी

0
काश्मिरी स्त्रीसंत लल्लेश्वरी

भारतीय संत-डॉ. अनुराधा कुलकर्णी

एका काश्मिरी पंडिताच्या पोटी, श्रीनगरजवळील सिमपूर येथे इ. स. १३२० मध्ये लल्लेश्वरी नामक एक स्त्रीसंतरूपी रत्न निपजले. लल्लेश्वरीला बालपणापासूनच भगवान शिवाची भक्ती करणे प्रिय होते. मात्र तिच्या मनावर वेदान्तातील अद्वैत सिद्धान्ताचा प्रभाव होता. काश्मीर हे संस्कृत भाषेतील प्रकांड विद्वानांचे शहर होते. अभिनव गुप्त, क्षेमेंद्र, उत्पल देव अशा काश्मीरच्या विद्वानांनी संस्कृत भाषेत महनीय साहित्य निर्माण केले आहे. संत लल्लेश्वरी यांनी मात्र काश्मीरच्या बोलीभाषेत आपल्या काव्याची रचना केली आहे. मात्र त्यांच्या काव्यातील तात्त्विक खोली अनन्यसाधारण आहे. हे काव्य प्रत्येकाच्या हृदयात हात घालते, त्याला अंतर्मुख करून आत्मोन्नतीचा मार्ग दाखवते.लल्लेश्वरीचा विवाह बाराव्या वर्षीच झाला. त्यांना कठोर सासुरवास भोगावा लागला. त्यातून तावूनसलाखून बाहेर पडलेल्या संत लल्लेश्वरीचे दर्शन आपण घेऊ या…

सकाळपासून अंगमहेनतीचे काम उपसून लल्ला आता अगदी थकून गेली होती. मध्यान्हाची वेळ झाल्याने पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. तितक्यात “एवढा मोठा भाताचा ढिगरा लागतो तिला…!’’ लल्लाची सासू कुणाशी तरी बोलत होती. हातात भाताने भरलेली थाळी घेऊन सासू लल्लाजवळ आली आणि थाळी ठेवून निघून गेली. लल्ला हात धुवून जेवायला बसली. कोरडाच भात असेना का, पण भुकेपुढे तो पाहूनही तिला आनंद झाला. पण जेवायला पुढे झालेला लल्लाचा हात एकदम थबकला. थाळीमध्ये एक मोठा दगड होता आणि त्यावर भाताचा फक्त पातळ थर होता…!लल्लाच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. तेवढ्यात तिचा नवरा तेथे आला. त्याच्यापुढे लल्लाने थाळी धरली, त्याच्या सर्व लक्षात आले, तरीही तो म्हणाला ‘आईने एवढे अन्न आणून दिले तरी अश्रू का गाळते?’ लल्लाकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून तोही निघून गेला…! आतापर्यंत सासरी होत असलेल्या तिच्या छळाची परमावधी झाली होती. लल्लाच्या डोळ्यांतल्या अश्रूंमध्ये भगवान शिवाची तेजस्वी मूर्ती चमकली आणि भारल्यागत ती घराच्या बाहेर पडली. आता लल्लाच्या मनात घरदार, आप्तस्वकीय, लोकलाज कशाचाही पाश नव्हता, तनामनाला झालेल्या वेदनाही तिला आता जाणवत नव्हत्या, लोकांनी भरलेले नगर तिच्यासमोर धुसर झाले होते. तिची पावले हिमगिरीकडे वेगात धावत होती. लल्लाने तिच्या लग्नाआधी ज्या सिद्ध श्रीकंठ नावाच्या शैव आचार्यांकडे शैवदर्शनाचे सखोल शिक्षण घेतले होते, तेच सिद्ध श्रीकंठ आता तिच्यापुढे ठाकले.

“ लल्ला… लल्ला…’’ म्हणून त्यांनी हाक मारली. पण त्यांच्या लक्षात आले, लल्लाला शिवमूर्तीशिवाय दुसरे काही दिसत नाहीय, ऐकू येत नाही. लौकिकाच्या मोहातून तिच्या मनाची पूर्ण सुटका झाल्याबद्दल त्यांची खात्री पटली. त्यामुळे त्यांनी तिच्या मस्तकावर आपला कृपाहस्त ठेवून तिला शास्त्रशुद्ध साधनेचा मार्ग दाखवला. लल्ला आता पूर्णसिद्ध योगिनी लल्लेश्वरी बनल्या होत्या. लोकांनीही त्यांचा पारमार्थिक अधिकार मान्य केला आत्मसाक्षात्कारानंतर त्यांचे काश्मिरी भाषेत उद्गार आहेत,दमादम करमस दमन हिल प्रजल्योम दीप ननेयम् जात ।अन्दर्युम प्रकाश न्यवर छोटुम गिर रोटुम करमस थपमी मोठ्या प्रयत्नाने प्राणांवर विजय मिळविला. माझ्या हृदयातला आत्मदीप प्रज्वलित होऊन उठला. मला आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले. मी अंतरिक ज्योत बाहेर प्रकट केली आणि माझ्या प्रियतम भगवंताला मी बांधून ठेवले शिवाच्या भक्तिप्रेमाच्या उन्मनी अवस्थेत लल्लेश्वरींच्या मुखातून अनेक सुंदर पद्यरचना बाहेर पडू लागल्या. लोकांना त्या अतिशय श्रवणीय वाटल्याने त्यांच्या त्या मुखोद्गतही झाल्या. काश्मीरमध्ये संत लल्लेश्वरींनी रचलेले कितीतरी काव्यचरण नीतिवाक्ये म्हणून प्रसिद्ध आहेत. लल्लेश्वरी म्हणतात, “ज्याने आपला-परका, दिवस-रात्र या सर्वांना समान मानले, त्याच्या मनात भेदभाव मुळीच राहिला नाही, त्यालाच ईश्वराची प्राप्ती झाली, असे समजावे. “सर्वव्यापी भगवान शिवांचा जटासंभार एखाद्या जाळ्याप्रमाणे विश्वाला आच्छादून टाकत आहे, सर्व प्राणिमात्रात भगवान शिवच भरले आहेत काश्मीरी भाषेत अभंगरचनेला ‘वाख’ असे म्हणतात. आपल्या एका वाख रचनेत लल्लेश्वरी म्हणतात, “मी माझ्या गुरूंकडून एकच धडा शिकले आहे, तो म्हणजे बाहेरून आत पाहायला शिका.” पूर्ण ऐक्याचा पुरस्कार करणाऱ्या संत लल्लेश्वरींच्या काळीही काश्मीरमध्ये हिंदू-मुसलमानांमधला संघर्ष तीव्र होता. मुसलमान राज्यकर्त्यांनी हजारो काश्मिरी हिंदूंना बाटविले आणि बाटलेले मुसलमानही हिंदूंवर अत्याचार करू लागले. लल्लेश्वरींनी आपल्या उपदेशात, हिंदू-मुस्लीम ऐक्यावर भर दिला. त्या म्हणतात, “शिव सर्वत्र आहे, त्याने चराचर सृष्टी व्यापलेली आहे. सर्व प्राणिमात्रांमध्ये तो असल्याने भेदभाव करू नका, आधी स्वतःला जाणा, कारण स्वतःला जाणणे म्हणजे शिवाला जाणणे होय” संत कबिराप्रमाणे लल्लेश्वरीही काश्मीरच्या हिंदू-मुसलमान दोन्ही समाजात आदरणीय ठरल्या. मुसलमानांमध्ये त्या ‘लल्ला अरिफ’ म्हणून तर हिंदूंमध्ये त्या ‘योगिनी लल्लेश्वरी’ म्हणून विख्यात झाल्या. त्यांच्या काव्यात शैवदर्शनातील अद्वैततत्त्वाप्रमाणे त्यांनी सुफी तत्त्वज्ञानातील प्रेमयोगही आहे. त्या अध्यात्माप्रमाणे जीवनातील प्रत्येक गोष्टींचा निवाडा आपल्या काव्यातून करतात. त्यामुळे आपल्या ज्ञानेश्वर-तुकारामादी संतांप्रमाणे लल्लेश्वरींचीही कित्येक वचने सुभाषितांसारखी काश्मिरी भाषेत आहेत. त्या म्हणतात,“जरी तुम्ही हुशार असलात तरी आपल्याला काही कळत नाही, अशा

रीतीने वागा’’“जरी तुम्ही पाहू शकत असलात तरी आपल्याला दसित नाही, असेच समजा’’“जरी तुम्ही ऐकू शकत असलात तरी आपल्याला ऐकू येत नाही, असेच समजा’’ “जे जे तुम्हाला प्राप्त झालेय, ते ते धैर्याने सहन करा, प्रत्येकाशी नम्रतेने, प्रेमाने वागा. या सवयीने तुम्ही नक्कीच अंतिम सत्यापर्यंत पोचाल…”आपण जे पाहतो, ऐकतो, अनुभवतो त्यापलीकडे अंतिम सत्य आहे, हे उपनषिदातले तत्त्वच लल्लेश्वरी येथे सांगून जातात. जर प्रत्येक जीवात्म्याशी आपण आत्मीयतेने वागलो तरच त्या अंतिम तत्त्वाला आपण अनुभवू शकू, असा ज्ञान आणि कर्मयोगाचा समन्वय लल्लेश्वरी करतात. संत लल्लेश्वरींच्या काव्यात आपल्या आध्यात्मिक स्वानुभवाचे वर्णन बरेच आहे. त्या म्हणतात, “तृषार्त भावनेने आकुल झालेल्या नजरेने मी शोधते आहे, रात्रंदिवस चहूकडे हेरते आहे. मी सत्याचा, मुक्ततेचा साक्षात्कार स्वतःच्या ठिकाणी करून घेतला आणि माझे नेत्र सफल झाले” एकदा संत लल्लेश्वरींना त्यांच्या एका शिष्याने विचारले “देवीजी, आजकाल जिकडे पाहावे तिकडे संघर्षाचे वातावरण आहे, अशावेळी आपण काय करावे?’’लल्लेश्वरी म्हणाल्या – आधी स्वतःचा शोध घ्यावा, आपल्या हृदयात वास करणाऱ्या शिवाचे दर्शन घ्यावे. हा शिव सर्व भेदभाव दूर करील. त्यावर शिष्य म्हणाला, “ पण मनाची अस्वस्थता कमी होत नाही ना..’’ लल्लेश्वरींनी त्यावर सांगतिले – “प्रथम आपल्या प्राणावर

ताबा मिळवावा, आपोआप मन स्थिर होईल. मग बघ आंतरिक ज्योत पेटते की नाही?”असे म्हणून लल्लेश्वरी गाऊ लागल्या
स्वर्ग तूच रे पृथ्वी तूच
दिवसरात्र वारा तूच
तू परमात्मा जीव तूच
पूजा तू अन् फुले तूच
जीवाशिवाचे ऐक्य सुंदर
तुझ्यामुळे मन होते स्थिर

शिष्याला आपल्या गुरुमाऊली लल्लेश्वरींचे म्हणणे पटले. त्यानंतर त्याने केलेल्या साधनेमुळे त्याला आत्मसाक्षात्कार झाला. संत लल्लेश्वरींनी आपल्या अवतारसमाप्तीच्या समयी समाधी लावल्यावर त्यांच्या शरीरातून एक ज्योतिर्मय दिव्य शलाका निघून आकाशात विलीन झाली. लल्लेश्वरी अंतर्धान पावल्या. त्यांच्या तेजस्वी संतत्वाला नमन करू या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here