Nashik Crime : सातपूरच्या कामगारनगर परिसरात रविवारी सायंकाळी एका घराच्या टेरेसवर गोणीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. यानंतर स्थानिकांनी पाहणी केल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. हत्या का झाली, हत्या कोणी केली आणि हत्या कोणाची झाली हे तीन मोठे प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले होते. अखेर या या तिन्ही प्रश्नांची उत्तरे शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
हत्या कोणी आणि का केली ?
एका १९ वर्षीय तरुणाने आपल्या २४ वर्षीय मित्राची उसनवार दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना सातपूर परिसरात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर संशयिताने मृतदेह गोणीत बांधून एका घराच्या टेरेसवर लपवून ठेवला होता. सातपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा लावून संशयिताला बेड्या ठोकल्या. वैष्णव मिलिंद शिंदे (वय २४, रा. कामगारनगर, सातपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, याप्रकरणी कृष्णा दुसाने (वय १९, रा. कामगारनगर, सातपूर) याला अटक करण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/06/23/nashik-crime-double-murder-causes-a-stir-in-the-area/
मित्रानेच घात केला
वैष्णव शिंदे आणि कृष्णा दुसाने एकमेकांचे मित्र होते. कृष्णाने वैष्णवला सुमारे नऊ हजार रुपये उसनवार दिले होते. मात्र, वारंवार मागणी करूनही वैष्णव पैसे परत करीत नसल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. पैशांच्या कारणावरून वैष्णव कृष्णाला टाळत असल्याने आणि शिवीगाळ करीत असल्याने कृष्णाच्या मनात राग निर्माण झाला होता.
https://prahaar.in/2026/06/23/midnight-shooting-creates-a-stir-in-mantarwadi-threat-issued-in-the-name-of-the-bishnoi-gang/
हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं ?
शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी वैष्णवने कृष्णाला फोन करून पैसे परत देण्यास सांगितले. त्यानंतर दोघांची भेट झाली. यावेळी वैष्णव आपल्याला पैसे न देता मारहाण करू शकतो, असा संशय कृष्णाच्या मनात निर्माण झाला. त्यातून झालेल्या वादात कृष्णाने वैष्णवच्या छातीत चाकूने वार केला. वैष्णवच्या छातीत वार झाल्यानंतर जखमी अवस्थेतील वैष्णवने कृष्णाकडे हॉस्पिटलला घेऊन जाण्याची विनवणी केली. कृष्णानेही स्वतः च्या अंगावरील शर्ट काढून त्याच्या जखमेवर बांधण्याचाही प्रयत्न केला.
मात्र, वैष्णव मोठ्याने आरडाओरडा करू लागल्याने कृष्णाने पुन्हा त्याच्या मानेवर वार केला. या हल्ल्याने वैष्णवचा मृत्यू झाला.त्यानंतर वैष्णवचा मृतदेह गोणीत भरून परिसरातील एका इमारतीच्या टेरेसवर नेऊन ठेवला. मृतदेह जास्त वेळ तसाच पडून राहिल्याने रविवारी (दि. २१) सायंकाळी परिसरात दुर्गंधी पसरू लागली आणि स्थानिकांना घटनेची माहिती मिळाली. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असता, मृतदेह वैष्णव शिंदे याचा असल्याचे निष्पन्न झाले.
https://prahaar.in/2026/06/23/speeding-truck-rams-into-moped-youth-dies-on-the-spot/
संशयित आरोपी ताब्यात
तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती आणि स्थानिक बातमीदारांच्या मदतीने संशयित कृष्णा दुसाने याचा शोध घेतला. तो नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातून मुंबईकडे जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
मृतदेहाची ओळख पटविण्यापासून ते आरोपीचा शोध घेण्यापर्यंत सातपूर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास केला. गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या १२ तासांत संशयिताला अटक करत गुन्ह्याचा छडा लावला. धक्कादायक म्हणजे संशयित कृष्णा दुसाने याच्यावर यापूर्वीही सातपूर पोलीस ठाण्यात दुखापतीच्या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४, ३२३, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सन २०१९ मधील या प्रकरणाचा खटला सध्या बाल न्यायालयात सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.