विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; सुनेत्रा पवारांसह अक्षय कर्डिले यांनी घेतली आमदारकीची शपथ
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून मुंबईत सुरुवात झाली. या अधिवेशनात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि प्रसारमाध्यमकर्मींना प्रवेशासाठी ‘डिजिटल फेस रेकॉग्निशन’ (चेहरा पडताळणी) प्रणाली अनिवार्य करण्यात आली. पहिल्या दिवशी तांत्रिक गोंधळामुळे ओळखपत्र दाखवून अनेकांना प्रवेश देण्यात आले. मात्र, मंगळवारपासून (२३ जून) ‘डिजिटल फेस रेकॉग्निशन’ नसलेल्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याची घोषणा विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर, तर विधान परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी केली.
https://prahaar.in/2026/06/22/neet-ug-re-exam-2026/
राष्ट्रगीत, वंदे मातरम् आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने विधानसभा आणि विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. बारामतीमधील पोटनिवडणुकीद्वारे विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अक्षय कर्डिले यांनी विधानसभेच्या सभागृहात सदस्यत्वाची व गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व प्रमुख मंत्री उपस्थित होते.
दुसरीकडे, विधानपरिषदेचे कामकाज सुरू होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात नव्याने प्रवेश केलेल्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा अधिकृत परिचय करून दिला. यामध्ये डॉ. नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, अंबादास दानवे, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे या नेत्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे सभागृहात स्वागत करत त्यांच्या पुढील संसदीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
https://prahaar.in/2026/06/22/supplementary-demands-worth-%e2%82%b997706-crore-presented/
आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात कला क्षेत्रातील दिग्गजांसह दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पद्मविभूषण आशा भोसले आणि पद्मभूषण सुमन कल्याणपूर, तसेच विधानसभेचे माजी सदस्य व माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर-पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या लंगडा मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, श्रीमती उषादेवी जगदाळे व श्रीमती शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला.
विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी
कामकाजाला सुरुवात होण्याआधी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर एकत्र येत “शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, तर सरसकट कर्जमुक्ती करा,” अशी घोषणाबाजी करत आंदोलन केले. मात्र, विरोधकांच्या या आंदोलनाचा सत्ताधाऱ्यांवर कोणताही परिणाम झाला नाही. सरकारच्या वतीने कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांचा समाचार घेतला. भरणे म्हणाले की, “महायुती सरकारने तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कदाचित सर्वच शेतकरी १०० टक्के समाधानी असतील असे आम्ही म्हणणार नाही, मात्र जास्तीत जास्त शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारने केला आहे, त्यामुळे विरोधकांनी स्टंटबाजी करू नये”, असा टोलाही त्यांनी लगावला.