Dipali Sayyad : राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या घटनांवर आधारित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू आहे. चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता असताना, शूटिंगदरम्यान समोर आलेल्या काही छायाचित्रांमुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे.
या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून त्या रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या भूमिकेतील त्यांचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
https://prahaar.in/2026/06/22/deool-band-2-box-office-collection-2/
फर्स्ट लूकमध्ये दिपाली सय्यद यांची वेशभूषा, देहबोली आणि एकूणच व्यक्तिमत्त्व रुपाली चाकणकर यांच्या शैलीशी साधर्म्य साधणारे दिसत असल्याने प्रेक्षकांमध्ये त्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर या लूकचे कौतुक करत चित्रपटाबाबतची उत्सुकता व्यक्त केली आहे.
चित्रपटाच्या कथानकाबाबत निर्मात्यांनी अद्याप अधिकृतपणे फारशी माहिती दिलेली नसली, तरी महाराष्ट्रातील काही गाजलेल्या राजकीय आणि सामाजिक घटनांवर भाष्य करणारी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो चर्चेचा विषय ठरला आहे.
https://prahaar.in/2026/06/20/the-magic-of-nora-fatehi-on-google/
दरम्यान, चित्रपटातील आणखी एका महत्त्वाच्या पात्राबाबत निर्मात्यांनी कमालीची गोपनीयता राखली आहे. चर्चेत असलेल्या ‘भोंदू खरात’ या पात्राची भूमिका कोणता अभिनेता साकारणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भूमिकेभोवतीचे रहस्य कायम असून, पुढील घोषणेकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.