Home ब्रेकिंग न्यूज Raj Thackeray : निवडणूक प्रक्रियेकडे दुर्लक्ष होण्यासाठी पांढऱ्या पट्ट्यांचे राजकारण

Raj Thackeray : निवडणूक प्रक्रियेकडे दुर्लक्ष होण्यासाठी पांढऱ्या पट्ट्यांचे राजकारण

0
Raj Thackeray : निवडणूक प्रक्रियेकडे दुर्लक्ष होण्यासाठी पांढऱ्या पट्ट्यांचे राजकारण

राज ठाकरे यांची टीका; ‘ऑपरेशन टायगर’सह सध्याच्या राजकीय स्थितीवर केले भाष्य

मुंबई : “‘एसआयआर’सह निवडणूक प्रक्रियेकडे आणि राज्यातील ज्वलंत प्रश्नांकडे जनतेचे पूर्णपणे दुर्लक्ष व्हावे, यासाठीच सध्या ‘पांढऱ्या पट्ट्यांचे राजकारण’ जाणीवपूर्वक सुरू करण्यात आले आहे. लोकांना अशा भावनिक आंदोलनांमध्ये गुंतवून ठेवायचे आणि आडोशाने आपले राजकीय उखळ पांढरे करून घ्यायचे, हा काही लोकांचा धंदाच झाला आहे,” अशा तिखट शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जैन मुनींच्या नावाने राजकारण करणाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे.

https://prahaar.in/2026/06/20/fifa-worldcup-2026-new-rule-proves-costly-for-paraguay-player/

मुंबईत आयोजित मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी शहरातील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर तसेच राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’वर भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, “आम्हाला प्रत्येक धर्माबद्दल आदर आहे. अनेक जैन बांधव वर्षानुवर्षे मुंबईत राहत आहेत आणि त्यांचे मुनी उत्तम काम करत आहेत. पण दुर्दैवाने, त्यातील काही मुनी सध्या भाजपच्या कच्छपी लागले असून तिथे राजकारण करत आहेत. एका कुरळ्या केसांच्या आणि दाढी ठेवून फिरणाऱ्या व्यक्तीला तर कोणी मुनीही म्हणत नाही. तो म्हणतो आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत; पण तुम्ही कधी मराठी माणसाचे मनगट पाहिले आहे का? आम्हाला कोणतेही वाद नको आहेत, पण कोणी स्वतःहून वाद उकरून काढणार असेल, तर आम्ही रस्त्यावर उभे राहू. अनेक मुनी नेहमीच रस्त्यावरून किंवा हायवेवरून पायी फिरत असतात, तेव्हा तुम्हाला पांढऱ्या पट्ट्यांची गरज लागत नाही. मग आताच सोसायट्यांमध्ये पांढरे पट्टे मारून तुम्ही तुमचे अस्तित्व दाखवत आहात का? मध्यंतरी कबुतरांचा विषय काढला, आता हा पांढऱ्या पट्ट्यांचा विषय पुढे आणला आहे. हे काही लोक राजकीय पक्षांच्या नादी लागून करत आहेत आणि यात जनतेला नाहक अडकवून ठेवले जात आहे.”

https://prahaar.in/2026/06/20/more-than-9-million-farmers-in-the-state-will-receive-significant-relief-ahead-of-the-kharif-season/

‘ऑपरेशन टायगर’वर बोलताना राज म्हणाले, “आपण आपल्या राज्याचे आणि देशाचे काय नुकसान करतोय, याचा विचार करायला हवा. आज राज्यात बेरोजगारीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे, अजून पाऊस पडलेला नाही, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे; आणि इथे मात्र सत्ताधाऱ्यांचे खासदार, आमदार आणि नगरसेवक फोडण्याचे सत्र सुरू आहे! आपली सत्ता कशी टिकेल, फक्त याच एका गोष्टीचा विचार सध्या सुरू आहे. यासाठी वाट्टेल तितके पैसे द्यायला हे तयार आहेत आणि माणसेही विकली जात आहेत. ज्या लोकप्रतिनिधींना निवडून आणण्यासाठी जनता पाच-पाच तास रांगेत उभे राहते, तेच लोक जर ५०-१०० कोटींसाठी विकले जात असतील, तर त्यांना तुम्ही पुन्हा उभे करणार का? आता ते जर परत तुमच्याकडे मते मागण्यासाठी आले, तर तुमची प्रतिक्रिया काय असणार? आम्ही आमच्या भविष्यातील पिढ्यांना काय सांगणार आहोत? आम्ही विकले गेलो आहोत, हे सांगणार का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला

 

सत्ताधारी पळवापळवीत मग्न

देशातील आणि राज्यातील वाढत्या आत्महत्यांच्या आकडेवारीवर बोट ठेवत राज ठाकरे यांनी थेट सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, “आज देशात आत्महत्यांचे प्रमाण किती वाढले आहे, याची आकडेवारी समोर आहे. मध्य प्रदेशमध्ये १५ हजार, गुजरातमध्ये ८ हजार आणि दुर्दैवाने सर्वांत जास्त म्हणजे २२ हजार १७४ आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. आज शेतकरी आणि विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, दुसरीकडे ‘नीट’ परीक्षेचे पेपर फुटत आहेत. जेव्हा ‘नीट’ परीक्षा आणली गेली, तेव्हाच मी तिला जाहीर विरोध केला होता. आज लहान मुलांना आणि मुलींना पळवण्याचे प्रकार वाढले आहेत. जसे खासदार-आमदार पळवले जातात, तशाच मुली पळवून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जात आहे. पण आपल्याकडे फक्त सत्ता टिकवण्यासाठी कोट्यवधी रुपये उधळायला हे तयार आहेत. यात सामान्य जनतेच्या मताला किंमत काय उरली? शून्य! रांगेत मेंढरासारखे उभे राहून मतदान करा आणि मोकळे व्हा, अशी जनतेची अवस्था झाली आहे.आज हे भाजपकडून सुरू आहे, उद्या दुसऱ्या पक्षाकडून सुरू होईल. याला खरोखर निवडणूक म्हणणार का? मी काल सहज म्हणालो की, बरे झाले आपले खासदार निवडून नाही आले. पण दुर्दैवाने या पळवापळवीच्या राजकारणात आपण मूळ आणि महत्त्वाच्या गोष्टी पूर्णपणे विसरून जात आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here