नवी दिल्ली : रोजगार निर्मितीला चालना देणे आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PMVBRY) अंतर्गत लाभ वितरण कार्यक्रम शुक्रवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील लाखो लाभार्थ्यांना सुमारे २,४०० कोटी रुपयांचे लाभ वितरित करण्यात आले.या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम व रोजगार तसेच युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय श्रम व रोजगार राज्यमंत्री तसेच एमएसएमई राज्यमंत्री शोभा करांदलाजे यांची प्रमुख उपस्थिती होती. देशभरातील विविध राज्ये आणि औद्योगिक केंद्रांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सुमारे २०० समांतर कार्यक्रमांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्य कार्यक्रमाशी जोडण्यात आले होते.
https://prahaar.in/2026/06/19/shrikant-shinde-wait-for-two-days-everything-will-become-clear/
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि सामाजिक सुरक्षेच्या माध्यमातून विकसित भारताच्या उभारणीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. औपचारिक क्षेत्रातील रोजगार वाढविणे आणि तरुणांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.PMVBRY योजनेच्या ‘भाग अ’ अंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या ईपीएफ वेतनाइतके, कमाल १५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. तर ‘भाग ब’ अंतर्गत अतिरिक्त रोजगार निर्माण करणाऱ्या पात्र नियोक्त्यांना प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी दरमहा ३ हजार रुपयांपर्यंत आर्थिक प्रोत्साहन देण्यात येते.
https://prahaar.in/2026/06/19/terrorism-and-the-indus-waters-treaty-cannot-go-hand-in-hand-india-tells-pakistan/
केंद्र सरकारने या योजनेसाठी ९९,४४६ कोटी रुपयांची तरतूद केली असून १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ या कालावधीत देशभरात ३.५ कोटींहून अधिक रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. योजनेमुळे तरुणांना औपचारिक क्षेत्रात रोजगार मिळण्यास मदत होणार असून सामाजिक सुरक्षा योजनांच्या कक्षेतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.मुख्य कार्यक्रमासोबतच विविध राज्यांमध्ये आयोजित प्रादेशिक कार्यक्रमांमध्ये लाभार्थी, उद्योग प्रतिनिधी, नियोक्ते आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले तसेच कामगार कल्याण योजना, ईपीएफओ सुविधा आणि अलीकडील कामगार सुधारणांबाबत जनजागृती करण्यात आली.
https://prahaar.in/2026/06/19/harshit-rana-harshit-rana-returns-to-the-indian-team-for-the-final-odi-against-afghanistan/
मुंबईतील वांद्रे येथील आयसीएआय सभागृहात आयोजित प्रादेशिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डीजीएफएएसएलआयचे महानिदेशक विकास चंद चतुर्वेदी, उप मुख्य श्रम आयुक्त (केंद्रीय) संजय डाबी, ईपीएफओचे प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-१ रितेश सैनी, क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त-२ अमित आठले तसेच महाराष्ट्र शासनाच्या अपर कामगार आयुक्त (कोकण विभाग) व संयुक्त कामगार आयुक्त (माथाडी विभाग) शिरीन संजू लोखंडे उपस्थित होत्या.महाराष्ट्रातील सुमारे एक लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच मुंबईतील कार्यक्रमादरम्यान दहा लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. नव्याने रोजगार मिळालेल्या युवक-युवतींनी यावेळी आनंद व्यक्त करत केंद्र सरकारच्या या उपक्रमाचे स्वागत केले.या योजनेमुळे देशातील रोजगार बाजाराला नवी गती मिळेल, औपचारिक रोजगार वाढेल आणि अधिकाधिक कामगार सामाजिक सुरक्षा व्यवस्थेच्या कक्षेत येतील. विकसित भारताच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.