Home ब्रेकिंग न्यूज Weather Alert: मान्सूनची प्रतीक्षा कायम! पुढील ४८ तास महत्त्वाचे, हवामान खात्याने दिला इशारा

Weather Alert: मान्सूनची प्रतीक्षा कायम! पुढील ४८ तास महत्त्वाचे, हवामान खात्याने दिला इशारा

0
Weather Alert: मान्सूनची प्रतीक्षा कायम! पुढील ४८ तास महत्त्वाचे, हवामान खात्याने दिला इशारा
summer heatwave

मुंबई : जून (June) महिन्याचा अर्धा टप्पा संपत आला असला तरी महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून (Monsoon) अद्याप पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णता आणि दमट हवामानाचा त्रास वाढला असून नागरिकांसह शेतकरीही चिंतेत आहेत. हवामान विभागाने राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.

https://prahaar.in/2026/06/18/smoke-from-a-moving-bus-followed-by-fire-within-moments-a-harrowing-incident-in-baramati/

कोकण विभाग

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान कायम आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असली तरी तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याने उकाड्याचा त्रास वाढला आहे.

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्येही तुरळक पावसाचा अंदाज आहे. मात्र सोलापूरसह काही भागांत तापमान ३४ ते ३७ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडा 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असली तरी उष्णतेचा प्रभाव कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://prahaar.in/2026/06/17/horrific-accident-on-the-dhule-solapur-highway/

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले असून उष्णतेचा चटका अधिक तीव्र झाला आहे.

हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४८ तास राज्यात उष्णता आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सून सक्रिय होऊन हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.