Home अध्यात्म संत निळोबाराय

संत निळोबाराय

0
संत निळोबाराय
Sant Nilobarai

एवढासा माझा भाव तो कायी।
तेवढाचि तुमचिये ठेविला पायीं॥
परी तुमचें अगाध देणें।
जाणवलें यावरी उदारपणें॥
एवढीसी माझी मति ते किती।
तेवढीची वाढवूनी केली सरती॥
एवढेंसे तुम्हां गाइंले जी देवा।
तेवढेची स्वीकारुनी तोषलेती भावा॥
एवढीशी माझी वाचा ते किती।
तेवढीची आपुलिये लाविली स्तुति॥
एवढासा निळा एवढीसी भक्ती।
अपारची तुम्ही मानिली प्रीती॥

संत निळोबाराय हे वारकरी परंपरेतील शेवटचे संत. त्यांनी संत तुकारामांना आपले गुरू मानले होते. त्यांची अभंगरचना भावपूर्ण आणि प्रासादिक आहे. तुकोबांच्या अभंगवाणीतूनच त्यांना काव्याची प्रेरणा मिळाली, त्यांच्या अभंगवाणीत ज्ञान, भनी व वैराग्य यांचा सुरेख संगम झाला आहे. या अभंगात संत निळोबाराय म्हणतात, हे देवा, तुमचाविषयी माझ्या अंतःकरणात असलेला प्रेमभाव कितीसा मोठा? तो एवढासा भाव मी विश्वासपूर्वक तुमच्या चरणी अर्पण केला. पण तुमचे देणे अगाध आहे. मला याबाबतीतले तुमचे औदार्य प्रकर्षाने जाणवत आहे. माझी बुद्धी तरी ती केवढी ? पण ती तुम्ही कृपापूर्वक वाढवून, आपल्या स्वरुपी रत करून घेतली. माझ्याकडून तुमच्या नामाचे एवढेसेच गुणगान नामसंकीर्तन माझ्याकडून घडू शकले. पण माझे अल्पस्वल्प भाव स्वीकारून तुम्ही माझ्यावर संतुष्ट झालात. एवढीशी माझी वाचा, माझे बोलणे; पण तेवढीही स्तुती तुम्ही गोड मानून घेतलीत.

https://prahaar.in/2026/06/18/hearing-on-upasanis-bail-plea-tomorrow/

(मासी वाचा ती केवढी? पण ती तुम्ही ईश्वरचरणी म्हणजे तुमका चरणी लावलीत) मी एवढासा, माझी भक्तीही नगण्य, अल्पशी. हे एवढेसे भक्तीप्रेम तुम्ही मोठे, श्रेष्ठ, अपार मानलेत. (हे तुमचे मोठेपण शब्दातीत आहे.) संतांची वृत्ती लीन आणि विनयशील असते. या रचनेतून निळोबारायाला विनम्रतेचा प्रत्यय येतो. एवढासा भाव, एवढीशी मती, एवढेसे गायन, एवढीशी वाचा, एवढीशी भक्ती या शब्दांद्वारे स्वत:कडे कमीपणा घेऊन परमेश्वराची सुती करणे हा समर्पणाचा भक्तीभाव व्यक्त होतो. अगाध देणे, उदारपणे, तोषविले भावा, लाविली स्तुती, मानिती प्रीती या शब्दांद्वारे त्यांचा परमेश्वराविषयीचा कृतज्ञताभाव व्यक्त होतो. संताचे मोठेपण विनम्रता, कृतज्ञता या जाणिवांमध्ये सामावलेले आहे. संतांचे संतपण ते हेच. परमेश्वराच्या परम दयाळूपणाबाबतची कृतज्ञता भावाचा मनोरम आविष्कार या अभंगात व्यक्त झाला आहे.

– डॉ. देवीदास पोटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here