ना माणसांत मिसळता आलं, ना माणसं सांभाळता आली! उलट मिळालेल्या पवित्र वारशाचा माज म्हणून प्रामाणिक, एकनिष्ठ शिवसैनिकांची टिंगलटवाळी, पाणउतारा करण्यात दिवस घालवले. अशा नेतृत्वाबरोबर कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींनी का राहावं?
निष्क्रिय नेतृत्वाच्या निष्क्रिय पक्षाचे दोन तृतीयांश खासदार पक्षातून बाहेर पडत असल्याने देशातील राजकारणात गेले दोन दिवस त्याचीच चर्चा आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेली फूट तिथल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा परिणाम आहे. महाराष्ट्रात तसं काहीच नाही. तरीही इथे गेले दोन – अडीच महिने ‘ऑपरेशन टायगर’ सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी सेनेला मोठा धक्का दिला, तेव्हां ‘पडद्यामागे काय सुरू आहे, याची स्पष्ट कल्पना मला होती’ असं विधान उबाठा प्रमुखांनी नुकतंच केलं. मग प्रश्न असा येतो, सर्व माहिती असूनही तुम्ही काय केलं? काहीच नाही?पक्ष वाचवावा असं तुम्हाला वाटलंच नाही? तुमची सगळी इच्छाशक्तीच मेली आहे का? आणि तसं असेल, तर तुमच्या बरोबर का राहायचं? असे प्रश्न निर्माण होतात.’ ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात आल्यानंतर ‘मातोश्री’ वर आयोजित केलेल्या खासदारांच्या बैठकीतही त्यांनी ‘ज्यांना जायचं आहे, त्यांनी खुशाल जा.
आज माझे दिवस चांगले नाहीत; पण नंतर येतील’, असं विधान केल्याचं प्रसिद्ध झालं आहे. राजकारण इतकं सोपं असतं, तर काय हवं होतं? इतक्या दैवभरवशी नेत्यावर विसंबून खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी आपली महत्त्वाची वर्षं का वाया घालवायची?’ ‘माझे चांगले दिवस येतील; तोपर्यंत वाट पहा’ असं सांगणारा असा नेता या पृथ्वीतलावर अजून तरी झाला नसेल! उबाठांनी कधी स्वतः जनतेत जाऊन निवडणूक लढवली नाही. त्यामुळे, जनमत सांभाळण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, याची कल्पना त्यांना नाही. हिंदुर्हदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा रक्ताचा वारस म्हणूनच केवळ राजकारणात यांचं अस्तित्व आहे. बाकी सगळं शून्य. ‘ठाकरे’ या आडनांवाच्या बळामुळेच यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत आयतं जाता आलं. संधी अनेक मिळाल्या; पण एकाही संधीचा नीट उपयोग करता आला नाही. ना माणसांत मिसळता आलं, ना माणसं सांभाळता आली! उलट मिळालेल्या पवित्र वारशाचा माज म्हणून प्रामाणिक, एकनिष्ठ शिवसैनिकांची टिंगलटवाळी, पाणउतारा करण्यात दिवस घालवले. अशा नेतृत्वाबरोबर कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींनी का राहावं? प्रत्येक फुटीसाठी दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा पूर्वीच आत्मपरीक्षण केलं असतं, तर आज पुन्हा तीच वेळ आली नसती, हे कोणीही सामान्य शिवसैनिक सांगेल!
https://prahaar.in/2026/06/18/video-pregnant-woman-dies-after-snakebite-in-odishas-malkangiri-angry-family-assaults-doctor-alleging-negligence/
राजकारणात सक्रीय असणं महत्त्वाचं असतं. संघटना बांधणी आणि तिची मजबूती ही तर अविरत चालणारी प्रक्रिया आहे. अन्य कोणत्याही नेत्याकडे, त्याच्या पक्षाकडे पहा. ‘देशात सर्वाधिक आळशी नेता आणि निष्क्रिय पक्ष कोणता?’ अशी जनमत चाचणी घेतली, तर खात्रीने उबाठाचाच पहिला नंबर येईल. नंबर नुसता येईलच असं नाही, तो वर्षानुवर्ष टिकेल! कारण निवडणुका येवोत, राज्यावर कुठलं संकट येवो, खासदार- आमदार-नगरसेवकाने आयोजित केलेला महत्त्वाचा कार्यक्रम असो, महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या घरी सुखदुःखाचे प्रसंग येवोत, उबाठा कधीच घराबाहेर पडणार नाहीत. बरं, त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचं कारण मान्य करावं, तर त्यांचे आमदार चिरंजीव तरी काही करतात का? तेही वातानुकूलित घराचा उंबरठा ओलांडत नाहीत. मग लोकांनी यांच्याबरोबर का राहायचं? यांचे कधीतरी चांगले दिवस येतील आणि मग आपलंही भलं होईल म्हणून? पक्षात उरलेल्यांनाच विचारा, त्यांचे अनुभव काय आहेत ते! यांची ही वक्तव्य आणि एकूण ऐषोआराम पाहून शरद पवार यांना मुख्यमंत्री पदासाठी यांच्या नावाचा आग्रह धरल्याचा सर्वाधिक पश्चात्ताप होत असेल. राज्यातल्या महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उबाठा हे दोन महत्त्वाचे पक्ष आहेत. काँग्रेसची राज्यभर वाताहात सुरू आहे. पक्षाला दमदार नेताच नाही. जे नेते दिसतात, त्यातल्या प्रत्येकाची तोंडं वेगवेगळ्या दिशेला. तरीही त्यांचे खासदार आणि आमदार स्थिर आहेत. फाटाफूट दरवेळी उबाठातच का होते? कारण, पक्षाचा जनमताचा पाया रोज ढासळतो आहे.
नवा कार्यकर्ता, नवा मतदार जुळणं सोडाच; आहेत त्यातही दरदिवस मोठी घसरण होते आहे. शाखांवर मरगळीचं सावट पसरलं आहे. ज्या मुंबईसाठी उबाठा पितापुत्राने अख्ख्या महाराष्ट्राकडे पाठ फिरवली, त्या मुंबईतल्या पक्ष संघटनेची स्थिती तरी काय वेगळी आहे? कोणाचा कोणाला वेळ नाही अन् कोणाचा पायपोस कोणात नाही!! राज्यातल्या जाऊ द्या, मुंबईच्या पक्षाला तरी काही कार्यक्रम, काही दिशा? सगळ्या बाजूंनी विस्कटलेल्या, ढासळत चाललेल्या पक्ष संघटनेला सावरण्यासाठी स्वतः काही करणार नाही आणि दुसऱ्याला काही करू देणार नाही – अशी परिस्थिती असेल, तर जे जनतेतून निवडून आले आहेत, त्यांनी जाणीवपूर्वक स्वतःचा सर्वनाश स्वतःच का ओढवून घ्यावा? इच्छाशक्ती मेलेल्या नेतृत्वाच्या निष्क्रीयतेचं ओझं त्यांनी का आणि किती दिवस वाहावं? पक्षात राहिलेल्या शेवटच्या तीन खासदारांनी आधी स्वतःसाठी या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत आणि मग दुसऱ्याला दोष द्यायला हवा.
https://prahaar.in/2026/06/18/hearing-on-upasanis-bail-plea-tomorrow/
उबाठाचे अ. भा. प्रवक्ते म्हणजे तर दिव्य पुरुष आहेत! जाणाऱ्या कोणालाही विचारलं, तर आपल्या पक्षत्यागाचं पहिलं श्रेय ते त्यांनाच देतील! सूर्य उगवला, की कोणावर तरी दुगाण्या झाडून, कुणाला शिवीगाळ करून किंवा त्यांच्या वयाएवढी ज्यांची राजकीय कारकीर्द आहे, त्यांना साक्षात्काराचे डोस पाजून आपलं पक्षकार्य पूर्ण झालं, असा त्यांचा समज असतो. स्वतःला ‘प्रति बाळासाहेब’ मानलं, की त्यांच्यासारखी भाषा वापरण्याचा अधिकार आपल्याला आपोआप मिळतो, हा त्यांचा भ्रम उबाठा गटाचं पूर्ण विसर्जन केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे, उद्या काय घडेल; संविधानिक तरतुदींतून कोण कशी वाट काढेल, हा विषय वेगळा असला, तरी गटाचं अस्तित्व’ निरंक’ होईपर्यंत फुटीची आणि ऱ्हासाची प्रक्रिया थांबणार नाही, एवढं नक्की. या गटाचं आता तेच नैसर्गिक भागधेय दिसतं आहे.