Mumbai : नागरिकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने या वर्षी ‘MyBMC MARG’ (Complaint Management and Redressal System) ही एकात्मिक तक्रार व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित विविध ११४ प्रकारच्या तक्रारी एकाच अँप्लिकेशनद्वारे नोंदविता येणार असून त्यांचा पाठपुरावा देखील करता येणार आहे. या अंतर्गत ‘MyBMC MARG’ प्रणालीवर रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तक्रारी मांडण्यास १६ जून पासून सुरुवात होत आहे. त्यामुळे यादिवसापासून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात येणार आहे.
https://prahaar.in/2026/06/16/special-courses-in-six-state-itis-to-develop-skilled-manpower-for-the-port-sector-minister-nitesh-rane/
पावसाळ्याच्या काळात काहीवेळा रस्त्यांवर खड्डे निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन आवश्यक दुरुस्तीची कार्यवाही करण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असते. नागरिकांकरिता खड्ड्यांबाबत तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. गतवर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘Pothole QuickFix’ हे स्वतंत्र मोबाईल अँप्लिकेशन सुरू केले होते. त्या अँप्लिकेशनद्वारे नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती, छायाचित्रे व स्थानासह तक्रारी नोंदविता येत होत्या. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
दरम्यान, महानगरपालिकेच्या विविध विभागांशी संबंधित तक्रारींसाठी नागरिकांना वेगवेगळ्या प्रणालींचा वापर करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना अधिक व्यापक आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून यंदापासून ‘MyBMC MARG’ ही सर्वसमावेशक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये ‘Pothole QuickFix’ हे मोबाईल अँप्लिकेशन एकत्रित (Merge) करण्यात आले आहे. त्यानुसार, रस्त्यांवरील खड्डे, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी समस्या, पाणीपुरवठा, रस्ते देखभाल, उद्याने, सार्वजनिक आरोग्य, कीटक नियंत्रण, अतिक्रमण, प्रकाशयोजना यांसह महानगरपालिकेच्या विविध विभागांशी संबंधित एकूण ११४ प्रकारच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा ‘MyBMC MARG’ वर उपलब्ध आहे.
https://prahaar.in/2026/06/16/irans-new-move-at-the-negotiating-table-help-from-psychiatrists-to-understand-trump/
या प्रणालीचे वैशिष्ट्ये
‘MyBMC MARG’ प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना एकाच व्यासपीठावरून तक्रार नोंदविणे, संबंधित छायाचित्रे अपलोड करणे, तक्रारीची सद्यस्थिती तपासणे, संबंधित विभागाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा मागोवा घेणे आणि तक्रार निकाली निघाल्यानंतर त्याबाबतची माहिती प्राप्त करणे शक्य होते. त्यामुळे तक्रार नोंदणीपासून निवारणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नागरिकाभिमुख झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे तक्रार नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि परिणामकारक होत असून नागरिकांना तक्रारींच्या निवारणाचा पाठपुरावा करण्यासाठी एकच सर्वसमावेशक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
https://prahaar.in/2026/06/16/corridor-virar-alibaug/
खड्ड्यांच्या दुरुस्तीची प्रक्रिया गतिमान
विशेषतः रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकांनी तक्रार नोंदविताना खड्ड्याचे स्पष्ट छायाचित्र, अचूक स्थान आणि आवश्यक तपशील उपलब्ध करून दिल्यास संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करणे अधिक सुलभ होते. यामुळे खड्ड्यांच्या दुरुस्तीची प्रक्रिया गतिमान होण्यास मदत होते. अँड्रॉइड वापरकर्ते नागरिक MyBMC MARG – Apps on Google Play आणि आयफोन वापरकर्ते नागरिक MyBMC MARG App – App Store या लिंकचा वापर करून आपल्या स्मार्टफोनमध्ये MyBMC MARG अँप्लिकेशन डाउनलोड करू शकतात. मुंबईकर नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतच्या सर्व तक्रारी ‘MyBMC MARG’ प्रणालीवरच नोंदवाव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.