मुंबई : मुंबईच्या (Mumbai) महापौर रितु तावडे (Mayor Ritu Tawde) यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात (Sion Bridge Accident) झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ताफ्यातील वाहनांची एकमेकांवर धडक झाली. सुदैवाने या अपघातात महापौर रितु तावडे यांच्यासह ताफ्यातील कोणालाही दुखापत झाली नाही.
https://prahaar.in/2026/06/16/deputy-chief-minister-eknath-shinde-reviewed-pre-monsoon-preparations-in-mumbai/
मिळालेल्या माहितीनुसार, महापौर रितु तावडे या एका नियोजित कार्यक्रमासाठी आपल्या ताफ्यासह जात होत्या. सायन पुलावरून प्रवास करत असताना अचानक एक दुचाकीस्वार ताफ्यासमोर आला. त्याला वाचवण्यासाठी ताफ्यातील आघाडीच्या एस्कॉर्ट वाहनाच्या चालकाने तातडीने ब्रेक लावला.
एस्कॉर्ट वाहन अचानक थांबल्याने त्यामागे असलेल्या महापौरांच्या वाहनाची समोरील गाडीला धडक बसली. त्यानंतर मागील एस्कॉर्ट वाहनही समोरील वाहनावर आदळले. त्यामुळे ताफ्यातील तीन वाहने एकमेकांवर धडकली.
अपघातानंतर काही काळ सायन पुलावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वाहनांचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत ताफ्यातील वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असून महापौरांसह सुरक्षा रक्षक आणि चालक सुखरूप आहेत.
https://prahaar.in/2026/06/16/mumbai-municipal-corporations-efforts-to-improve-the-quality-of-education-are-praiseworthy-governor-jishnu-dev-varma-lauds-the-initiative/
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सायन पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, महापौरांचा पुढील प्रवास सुरळीत सुरू राहावा यासाठी तातडीने पालिकेच्या ताफ्यातील पर्यायी वाहनाची व्यवस्था करण्यात आली. नुकसानग्रस्त वाहने बाजूला करून महापौरांना दुसऱ्या वाहनातून पुढील कार्यक्रमासाठी रवाना करण्यात आले.