४ खासदार उत्सुक; मराठवाड्यातील ‘त्या’ नेत्याला लॉटरी लागण्याची शक्यता
मुंबई : उबाठा गटातील अंतर्गत अस्वस्थतेचा फायदा उठवत सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेले ‘ऑपरेशन टायगर’ आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याची चर्चा आहे. ६ खासदारांचा एक गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असून, या मोहिमेचे नेतृत्व मराठवाड्यातील एका वरिष्ठ खासदाराकडे असल्याचे समजते. उबाठाला हा मोठा धक्का देण्याच्या बदल्यात मराठवाड्यातील ‘त्या’ खासदाराला दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या संभाव्य बंडखोर गटातील इतर ४ खासदारही स्वतः मंत्रिपदासाठी उत्सुक असल्याने, ‘ऑपरेशन टायगर’चे घोडे सध्या दिल्लीतील मंत्रिपदाच्या चढाओढीत अडकल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
https://prahaar.in/2026/06/16/leopard-attacks-two-people-in-chinchkhed/
१९ जून रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. उबाठाचे लोकसभेतील ९ पैकी तब्बल ६ खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असून, याच नाराजीतून हा नवा राजकीय भूकंप घडवण्याची तयारी सुरू आहे. या संभाव्य बंडाची कुणकुण लागताच पक्षनेतृत्वाने ‘मातोश्री’वर सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला केवळ चारच खासदार प्रत्यक्ष हजर होते, तर उर्वरित ५ खासदारांनी बैठकीला दांडी मारली होती. खासदार संजय राऊत यांनी हे ५ खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा केला असला, तरी या अनुपस्थितीने पक्षातील नाराजी चव्हाट्यावर आणली आहे. ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार या बैठकीला अनुपस्थित होते. यातील यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी तर दिल्ली गाठत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
https://prahaar.in/2026/06/16/a-drone-and-robotics-revolution-now-in-maharashtra/
पक्षांतर बंदी कायद्यानुसार लोकसभेत अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच ६ खासदार फुटणे आवश्यक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील एका वरिष्ठ खासदाराच्या नेतृत्वाखाली हा ६ खासदारांचा गट तयार झाला असून त्यांची दिल्लीत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गुप्त बैठकही पार पडली आहे. हा गट थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गटाचा मान्यता प्रस्ताव देण्याच्या तयारीत आहे.
https://prahaar.in/2026/06/16/despite-skipping-the-cabinet-meeting-things-unfolded-against-shambhuraj-desais-wishes/
७ खासदार आणि १६ आमदार संपर्कात – कृपाल तुमाने
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी खळबळजनक दावा केला आहे. “महाविकास आघाडीतील आणि प्रामुख्याने उबाठा गटातील ७ विद्यमान खासदार आणि विविध पक्षांचे १६ आमदार आमच्या संपर्कात आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्यादरम्यान हे मोठे चेहरे जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश करतील,” असेही ते म्हणाले. आमदार दीपक केसरकर यांनीही “येत्या काळात आमची शिवसेना आणखी मजबूत होणार,” असे सांगत तुमानेंच्या विधानाला दुजोरा दिला आहे.