लातूर : जून महिना अर्धा संपत आला असताना लातूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका कायम आहे. मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले असतानाही अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. पेरणी हंगाम तोंडावर आला असूनही पावसाने हुलकावणी दिल्याने शेतीची कामे रखडली आहेत.जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी खते व बियाणे खरेदी करून घरी आणून ठेवले आहेत. पाऊस पडताच पेरणीला सुरुवात करण्याची तयारी त्यांनी पूर्ण केली आहे. मात्र, जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणी करणे धोक्याचे ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.सध्या दिवसभर प्रखर ऊन पडत असून उष्णतेमुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर व बाजारपेठेत तुलनेने कमी वर्दळ दिसून येत आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढली आहे.
https://prahaar.in/2026/06/14/raigad-accident-massive-explosion-in-jnpt-area-two-workers-killed/
एल निनोमुळे शेतकरी चिंतेत
जळकोट तालुक्यासह परिसरात पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला काही भागांमध्ये चांगला पाऊस पडला मात्र यानंतर पावसाने उघडीत दिली आहे. यावर्षी एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी खते व बियाण्यांची तयारी करून ठेवली असली तरी पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. वेळेत व पुरेसा पाऊस पडावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
https://prahaar.in/2026/06/14/husband-arrested-in-connection-with-the-deaths-of-his-wife-and-two-daughters-action-taken-by-mangaon-police/
कापूस लागवड तसेच मुगाची पेरणी मृग नक्षत्रामध्ये होणे गरजेचे
जळकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात. मात्र यावर्षी मृग नक्षत्रामध्ये म्हणावा तसा पाऊस पडला नाही. यामुळे कापसाची लागवड रखडली आहे. कापूस लागवड मृग नक्षत्रामध्ये होणे गरजेचे आहे. मृग नक्षत्रामध्ये कापसाची लागवड झाली. तरच कापसाचे उत्पादन चांगले मिळते अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. यासोबतच मुगाची पेरणी देखील मृग नक्षत्रामध्येच व्हावी लागते. परंतु आता अर्धा मग नक्षत्र संपला तरीही कोणाचे चटके कायम आहेत, यामुळे यंदा कापसाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कृषी तज्ज्ञांच्या मते, मान्सून सक्रिय झाल्यानंतर चांगला पाऊस झाल्यास पेरणीला वेग येईल. मात्र पावसाचा आणखी विलंब झाल्यास खरीप हंगामाच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी आणि कृषी विभागाचे अधिकारीही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.दरम्यान, हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून लवकरात लवकर समाधानकारक पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामाची सर्व तयारी पूर्ण असतानाही पावसाअभावी शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे