Home ब्रेकिंग न्यूज Sandeep Deshpande : मनसे आणि जैन धर्मगुरूंमध्ये वादाची ठिणगी

Sandeep Deshpande : मनसे आणि जैन धर्मगुरूंमध्ये वादाची ठिणगी

0
Sandeep Deshpande : मनसे आणि जैन धर्मगुरूंमध्ये वादाची ठिणगी

मुंबई : मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्या आणि सार्वजनिक रस्त्यांवर जैन धर्मगुरूंच्या येण्या-जाण्यासाठी मारण्यात येणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांवरून आता मनसे विरुद्ध जैन समाज असा नवा वाद उफाळला आहे. घाटकोपरमधील सोसायटीतील वाद मिटत असतानाच, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दादरमधील पांढऱ्या पट्ट्यांवरून मुंबई महानगरपालिकेला इशारा दिला आहे. मनसेच्या या भूमिकेवर जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेत, “संदीप देशपांडे दोन समाजात दरी निर्माण करत असून जैन समाज शांतताप्रिय आहे याचा अर्थ आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत,” असा इशारा दिला आहे. या प्रकारामुळे मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वादाला धार्मिक रंग मिळण्याची चिन्हे आहेत.

घाटकोपरमधील वादाच्या पार्श्वभूमीवर, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादर पश्चिम येथील डी. एस. बाबरेकर मार्गावरील पांढऱ्या पट्ट्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. येथील जैन मंदिराच्या शेजारील गल्लीत, लेनच्या सुरुवातीपासून ते गोकुळ धाम इमारतीपर्यंत रस्त्यावर पांढरी पट्टी मारण्यात आली आहे. सार्वजनिक रस्त्यांचे असे धार्मिक कारणांसाठी वर्गीकरण करण्याला देशपांडे यांनी विरोध दर्शवत महापालिकेने यावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईलने या पट्ट्या पुसल्या जातील असा इशारा दिला होता.

संदीप देशपांडे यांच्या इशाऱ्यानंतर जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी यांनी पत्रकार परिषद घेत मनसेवर तोफ डागली. “संदीप देशपांडे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे जाणारे म्हणवत असतील, तर त्यांनी इतिहास तपासावा. बाळासाहेबांनी जैन आणि मारवाडी समाजावर नेहमी प्रेम केले, त्यांना कधीही त्रास दिला नाही. संदीप देशपांडे, तुम्हाला जर खरंच कायद्याची चाड असेल, तर तुम्ही मुंब्रा, भेंडी बाजार किंवा पायधुनीला जा. तिथे ईदच्या दिवशी किंवा नमाज पठणाच्या वेळी ज्याप्रकारे रस्त्यावर पांढरे कापड घालून रस्ते अडवले जातात, त्याला विरोध करून दाखवा. मुंब्रामध्ये एमआयएमची नगरसेविका जेव्हा ‘मुंब्रा हरा कर दुंगी’ अशी विधाने करते, तेव्हा तुमचा आक्रमकपणा कुठे जातो? तिथे विरोध करा, दोन शांतताप्रिय समाजामध्ये तेढ निर्माण करू नका.”

नेमका वाद काय?
– या वादाची ठिणगी घाटकोपरमधील एका सोसायटीतून पडली. रील्स स्टार प्रसाद वेदपाठक याच्या सोसायटीच्या आवारात काही जैन कुटुंबीयांनी पांढऱ्या रंगाची पट्टी मारली होती. जैन चातुर्मास किंवा धार्मिक विधी दरम्यान जैन साधू-संतांना चालताना पायाला अशुद्ध गोष्टी लागू नयेत, यासाठी ही पट्टी आखण्यात आल्याचा दावा केला गेला. यावर प्रसाद वेदपाठकने सोशल मीडियावरून जाहीर आक्षेप घेतला की, धार्मिक मान्यता पाळायच्या असतील तर त्या घरात पाळाव्यात, सार्वजनिक किंवा सोसायटीच्या सामायिक जागेत असे कृत्य करणे बेकायदेशीर आहे.
– माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर आणि सोसायटी सदस्यांच्या तीव्र विरोधानंतर अखेर त्या पांढऱ्या पट्टीवर पालिकेने किंवा सोसायटीने रंगकाम करून ती पुसून टाकली. प्रसादनेही हा वाद आता संपल्याचे जाहीर केले होते. मात्र, दादरमधील नव्या प्रकरणामुळे आणि मनसेच्या एन्ट्रीमुळे हा वाद आता मुंबईभर पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here