नवी दिल्ली : ”माझ्यासाठी जनता हीच देवाचे रूप आहे आणि म्हणूनच मी या सेवेकडे नेहमीच एक ‘साधना’ म्हणून पाहिले आहे. आपण कधीही या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता आणि सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून सेवा करण्याची संधी मिळणे हे मी माझे परम भाग्य समजतो”, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. भारताचे सर्वाधिक काळ सलग कार्यरत असणारे लोकनिर्वाचित पंतप्रधान बनण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानिमित्त आयोजित एनडीए नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
https://prahaar.in/2026/06/10/prime-minister-modis-place-in-the-creation-of-a-new-india-is-unshakable/
पुढे बोलताना ते म्हणाले, “तुम्ही सर्वांनी आजचा दिवस माझ्यासाठी खरोखरच संस्मरणीय बनवला आहे. मी अत्यंत भारावून गेलो आहे आणि तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे. ‘चरैवेती, चरैवेती’ (सतत पुढे चालत राहा) या मंत्राचा जप करत आणि या राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार पाहत, आपण कधी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचारही मी केला नव्हता. भारतमातेची इतका मोठा काळ सेवा करण्याची संधी मिळणे, हे केवळ ईश्वराच्या विशेष कृपेमुळेच शक्य आहे. माझ्यासाठी जनता हीच देवाचे रूप आहे आणि म्हणूनच मी या सेवेकडे नेहमीच एक ‘साधना’ म्हणून पाहिले आहे. ही साधना कधीही एकाकी नव्हती; हा एक सामूहिक ‘यज्ञ’ आहे, ज्यामध्ये तुम्ही सर्वांनी आणि इतर अनेक सहकाऱ्यांनी कर्तव्य भावनेने आपले योगदान दिले आहे.”
https://prahaar.in/2026/06/10/devendra-fadnavis-the-journey-from-a-capable-india-to-a-developed-india-is-possible-only-because-of-prime-minister-modi/
यावेळी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या सरकारने केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी केला. ते म्हणाले, “माझा असा विश्वास आहे, कि जे कालपर्यंत गरीब होते आणि आता ‘नव-मध्यमवर्ग’ बनले आहेत, त्यांना आपण पुन्हा मागे पडू देता कामा नये. म्हणूनच, सरकार आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण दिवस-रात्र काम केले पाहिजे. १४० कोटी जनतेने आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला आणि अपेक्षांना पूर्ण करण्याच्या संकल्पाने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. आपल्याला भारतातील तरुण, महिला, मध्यमवर्ग आणि शेतकऱ्यांच्या आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत.”
https://prahaar.in/2026/06/10/chandrashekar-bawankule-separate-ready-reckoner-rates-now-for-skyscrapers-and-slums/
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी एक ठराव मंजूर केला. यामध्ये देशातील सर्वाधिक काळ सेवा करणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक करण्यात आले असून, हा दिवस भारतीय लोकशाहीच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे म्हटले आहे. ४,३९९ दिवस सलग निर्वाचित पंतप्रधान म्हणून सेवा करण्याचा विक्रम प्रस्थापित करत त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला आहे. नेहरू यांनी १९५२ ते १९६४ या काळात सलग ४,३९८ दिवस निर्वाचित पंतप्रधान म्हणून सेवा केली होती. या ठरावात नमूद करण्यात आले आहे की, हा प्रसंग भारताची लोकशाही जाणीव, जनविश्वास आणि लोकसहभागाच्या शक्तीचे प्रतीक आहे, जे ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पाने प्रेरित असलेल्या नेत्याला जनतेने दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्याचे दर्शन घडवते.