सोन्या-चांदीच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत असतानाच आज सराफा बाजारातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) पासून ते देशातील प्रमुख सराफा बाजारांपर्यंत सर्वत्र सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. (Gold Silver Rate Today)
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियातील तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या बाजारावर दिसून आला आहे. आजच्या व्यवहारात सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
https://prahaar.in/2026/06/10/fire-station-to-be-set-up-in-chandivali/
MCX वर 5 ऑगस्ट डिलिव्हरीच्या सोन्याच्या वायद्यांमध्ये मोठी घसरण दिसून आली. मागील सत्रात प्रति 10 ग्रॅम 1,52,443 रुपयांवर बंद झालेल्या सोन्याचा भाव बाजार उघडताच 1,49,926 रुपयांपर्यंत खाली आला. सुरुवातीच्या व्यवहारातच सोन्याने जवळपास 2,943 रुपयांची घसरण नोंदवली. त्यानंतरही घसरण कायम राहिल्याने सोने 1,49,500 रुपयांच्या आसपास व्यवहार करत असल्याचे दिसून आले.
चांदीच्या बाजारात तर आणखी मोठी पडझड पाहायला मिळाली. MCX वर चांदीच्या दरात तब्बल 5 हजार रुपयांची घसरण झाली. याशिवाय प्रत्यक्ष सराफा बाजारात चांदीच्या किंमतीत जवळपास 10 हजार रुपयांची घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चांदीचा दर प्रति किलो 2.50 लाख रुपयांपर्यंत खाली आला आहे.
सराफा बाजारातील ताज्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात 4,300 रुपयांची घसरण झाली असून ते प्रति 10 ग्रॅम 1,48,860 रुपयांवर आले आहे. दागिन्यांसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत 3,950 रुपयांची घसरण झाली असून त्याचा दर 1,36,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 3,230 रुपयांची घट होऊन ते 1,11,640 रुपयांवर आले आहे.
https://prahaar.in/2026/06/10/sensation-in-bhayandar-case-of-burnt-body-found-in-mangroves-solved-three-real-brothers-arrested/
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरची वाढती ताकद, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाबाबत बदलणाऱ्या अपेक्षा आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता यामुळे सोन्या-चांदीवर दबाव निर्माण झाला आहे. तसेच गुंतवणूकदारांकडून नफा वसुली सुरू झाल्यानेही किंमतींमध्ये घसरण झाली आहे.
दरम्यान, लग्नसराईचा हंगाम आणि सणासुदीच्या खरेदीपूर्वी झालेली ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक मानली जात आहे. अनेकांनी सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी बाजाराकडे पुन्हा मोर्चा वळवला आहे. मात्र तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला असून जागतिक परिस्थिती लक्षात घेता पुढील काही दिवस बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.