पुणे : पुण्यात पुन्हा एकदा कथित रेव्ह पार्टीचा (Raid On Pune Rave Party) पर्दाफाश झाला असून गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात मोठी कारवाई केली आहे. आळंदी-मरकळ रस्त्यावरील एका खासगी रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या या पार्टीतून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारू आणि संशयास्पद पदार्थ जप्त केले आहेत. (Pune Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी बंगल्यात या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. “प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी” या नावाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनेक तरुण-तरुणी सहभागी झाल्याचे समोर आले आहे. पार्टीसाठी सोशल मीडिया आणि खास संपर्कांच्या माध्यमातून निमंत्रणे देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
https://prahaar.in/2026/06/07/rules-for-edible-oil-sales-to-change-major-decision-by-the-centre-oil-will-now-be-available-in-only-9-pack-sizes/
गुन्हे शाखेला या कार्यक्रमाबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला. कारवाईदरम्यान अनेक जण नशेच्या अवस्थेत आढळल्याचे सांगितले जात आहे. तसेच घटनास्थळावरून काही संशयास्पद अमली पदार्थ आणि विनापरवाना दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या पदार्थांची तपासणी करण्यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
या कारवाईत सुमारे ६० ते ७० तरुण-तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची ओळख, पार्टीतील सहभाग आणि अमली पदार्थांशी संबंधित कोणताही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.
पोलिस आता या कार्यक्रमाचे आयोजक कोण होते, पार्टीसाठी आर्थिक मदत कोणी केली, तसेच अमली पदार्थांचा पुरवठा कुठून झाला याचा शोध घेत आहेत. रिसॉर्ट व्यवस्थापनाची भूमिकाही तपासली जात असून संबंधितांकडून माहिती गोळा करण्यात येत आहे.
या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा रेव्ह पार्टी आणि अमली पदार्थांच्या वापराबाबत चर्चा सुरू झाली आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून चौकशीनंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.