Taste Atlas च्या जगभरातील सर्वोत्तम सँडविचेसच्या यादीत मानाचे स्थान
मुंबई : मुंबई म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते ती कधीही न थांबणारी लोकल आणि मुंबईकरांच्या जिवाभावाचा सोबती असलेला ‘वडापाव’. (Wada Pav) आज मुंबईच्या कानाकोपऱ्यात लाखो वडे तळले जात असून, चटणी-पावाच्या साथीने ते रोज हजारो कष्टकऱ्यांची भूक भागवत आहेत. पण या अथांग गर्दीतही एका वडापावने स्वतःची वेगळी आणि अढळ ओळख निर्माण केली आहे. तो म्हणजे दादरचा सुप्रसिद्ध ‘अशोक वडापाव’, ज्याला मुंबईकर ‘किर्ती कॉलेजचा वडापाव’ म्हणूनही ओळखतात. तिखट-गोड चटण्यांची जुगलबंदी, झणझणीत सुकी चटणी आणि सोबतीला मिळणारा कुरकुरीत चुरा या वैशिष्ट्यांमुळे या वडापावने मुंबईकरांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता याच अस्सल मुंबईकर चवीचा डंका थेट जागतिक पातळीवर वाजला आहे.
https://prahaar.in/2026/06/02/mumbai-mumbai-ahmedabad-bullet-train-project-update-417-metre-long-third-mountain-tunnel-breakthrough-achieved-in-palghar-video/
Taste Atlas च्या जागतिक यादीत २५वे स्थान
View this post on Instagram
जागतिक खाद्यसंस्कृतीची नोंद ठेवणाऱ्या प्रसिद्ध ‘Taste Atlas’ या आंतरराष्ट्रीय वेबसाइटने जगातील सर्वोत्तम सँडविचेसची यादी जाहीर केली आहे. अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे, या जागतिक क्रमवारीत मुंबईच्या ‘अशोक वडापाव’ने २५वे स्थान पटकावले आहे. या मानाच्या यादीत स्थान मिळवताना अशोक वडापावला ४.१ स्टार रेटिंग देण्यात आले आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतरच्या काळात या वडापाव केंद्राची सुरुवात झाली आणि अल्पावधीतच याची प्रसिद्धी वाऱ्यासारखी पसरली. मुंबईतील वेगवान आणि धकाधकीच्या ‘वर्कलाईफ’मध्ये झटपट आणि पोटभरीचा पर्याय म्हणून अशोक वडापाव मुंबईकरांच्या जीवनशैलीचा आणि खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनला, अशी विशेष नोंद ‘Taste Atlas’ ने केली आहे. मागील ५ ते ६ दशकांपासून चवीत किंचितही बदल न करता ही परंपरा आजही तितक्याच दर्जेदारपणे सुरू आहे.
गिरणी कामगारांचे ‘पूर्णान्न’ ते आजचा ब्रँड!
मुंबईत वडापावचा प्रवास साधारणपणे १९६० च्या दशकात सुरू झाला. याच्या जन्माबाबत अनेक रंजक कथा सांगितल्या जातात. काही जाणकारांच्या मते ‘ओगले काकू’ यांनी पहिल्यांदा वडापाव सुरू केला, तर काहींच्या मते ‘अशोक वैद्य’ यांनी पहिल्यांदा बटाटावडा पावाच्या मध्यभागी ठेवून लोकांना खायला दिला आणि तिथूनच या महान पदार्थाचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात मुंबईतील गिरणी कामगारांसाठी वडापाव हा सर्वात स्वस्त, सुटसुटीत आणि पोटभर जेवणाचा उत्तम पर्याय ठरला. म्हणूनच त्याला मुंबईकरांचे ‘पूर्णान्न’ म्हटले गेले. काळ बदलला तशा किमतीही बदलल्या. एकेकाळी अवघ्या काही पैशांना मिळणारा वडापाव नंतर १ ते ५ रुपयांवर गेला. आज मुंबईच्या वेगवेगळ्या भागांत वडापावची किंमत २० ते २५ रुपयांपासून अगदी ३० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मात्र, किंमत कितीही बदलली तरी मुंबईकरांचे वडापाववरचे प्रेम आजही तसूभरही कमी झालेले नाही.
मुंबईतले ‘हे’ ८ वडापाव खाल्ले नाहीत, तर तुम्ही खरे मुंबईकर नाही!
१ अशोक वडापाव (किर्ती कॉलेज, दादर)
जागतिक कीर्ती लाभलेला वडापाव. चवदार चटण्या, भरपूर चुरा आणि अनेक सेलिब्रिटींचे आवडते ठिकाण.
२ ग्रॅज्युएट वडापाव (भायखळा पूर्व)
गेल्या अनेक वर्षांपासून भायखळा परिसरात चवीची सातत्यपूर्ण परंपरा जपणारा वडापाव.
३ बोरकर वडापाव (गिरगाव)
येथील वड्याच्या सारणात काजू आणि शेंगदाणे वापरले जातात. सोबत मिळणारी चटणी अत्यंत खास असते.
४ आराम वडापाव (CST स्टेशन समोर)
श्रीरंग तांबे यांनी सुरू केलेल्या या दुकानात आता तिसरी पिढी कार्यरत आहे. येथे पारंपारिक वडापावसोबतच चीझ ग्रिल्ड, बटर ग्रिल्ड आणि शेजवान ग्रिल्ड वडापावचे प्रकार मिळतात.
५ लाडूसम्राट (लालबाग)
येथील वडापाव आकाराने आणि चवीने उत्तम असून, त्यासोबत मिळणारी खोबऱ्याची चटणी ग्राहकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
६ शिवाजी वडापाव (मिठीबाई कॉलेज जवळ, विलेपार्ले)
एका दिवसात १,००० पेक्षा जास्त वडे तळण्याचा विक्रम या स्टॉलच्या नावावर आहे. शेजवान, चीज आणि बटर वडापावसाठी पार्लेकरांची येथे नेहमीच झुंबड उडते.
७ सम्राट वडापाव (विलेपार्ले स्टेशन समोर)
हा वडापाव खाण्यासाठी लोक दूरवरून येतात. वडापावसोबत मिळणारी ‘मिक्स भजी’ हे येथील अतिरिक्त आकर्षण आहे.
८ श्रीकृष्ण वडा (दादर)
या वड्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथे ‘पाव’ मिळत नाही! फक्त अस्सल चवीचा बटाटावडा, तिखट चटणी आणि तळलेल्या मिरच्या अशा अजोड चवीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.