IPL 2026 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी, ३१ मे रोजी इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ हंगामाचा शानदार समारोप झाला. जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीगच्या १९व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरात टायटन्स (GT) संघाचा एकतर्फी पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले.
नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
दरम्यान ‘आयपीएल’ क्रिकेट सामन्यांच्या या अंतिम थरारापूर्वीच नाशिक पोलिसांनी एक मोठी कारवाई केली. लेखानगर परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हायटेक ऑनलाइन क्रिकेट बेटिंगचा (सट्टा) अड्डा अंबड पोलिसांनी (Ambad Police) छापा टाकून उद्ध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी राजस्थान आणि गुजरात यांच्यातील सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या आणि चालवणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
राजस्थान व गुजरात या दोन संघाच्या सामन्यांवर बोली लावून कोट्यवधींची उलाढाल केली जात होती. पोलिसांनी घटनास्थळावरून विविध कंपन्यांचे नऊ मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि सट्टेबाजीचे इतर साहित्य जप्त केले आहे. या जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत दोन लाख ८३ हजार ५० रुपये आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जळगावच्या तीन संशयितांचा समावेश असून, एक जण नाशिकचा रहिवासी आहे.
https://prahaar.in/2026/06/01/lpg-gas-cylinder-price-lpg-consumers-get-another-shock-gas-cylinder-price-hike-new-rates-effective-from-today/
बेटींगसाठी ‘क्रिकेट लाईन गुरू’
‘क्रिकेट लाईन गुरू’ या संकेतस्थळाचा संशयितांनी बेटींगसाठी वापर केल्याचे उघड झाले आहे.आयपीएलच्या महाअंतिम सामन्यासाठी या हॉटेलमध्ये सट्टेबाजीची मोठी तयारी सुरू होती. मात्र, अंतिम सामन्यातील सट्टेबाजीचा कट पोलिसांनी त्याआधीच्या सामन्याच्या वेळीच छापा टाकून उधळून लावला. माहितीनुसार, २९ मे रोजी रात्री १०:२८ वाजेच्या सुमारास अंबड पोलिसांच्या (Ambad Police) पथकाने लेखानगर येथील हॉटेलमधील रूम क्रमांक १०४ वर अचानक छापा टाकला. ही कारवाई ३० मे रोजी पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू होती.
चार जण ताब्यात
या कारवाईत नावाजलेले बुकी पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहे. या छाप्यात अटक करण्यात आलेल्यांमध्ये योगेश प्रदीप महाजन (वय ३१), सागर नवल तायडे (वय ३३, जळगाव) सत्यम रघुनाथ भोई (वय ३९, जळगाव) आणि विनायक लक्ष्मण जाधव (वय ३९, सिडको, नाशिक) यांचा समावेश आहे.
प्राथमिक तपासात संशयितांनी संगनमत करून ‘क्रिकेट लाईन गुरू’ या संकेतस्थळाचा बेटींगसाठी वापर केल्याचे निष्पन्न झाले. ते मोबाईलद्वारे तब्बल १३ मोठ्या ग्राहकांच्या (सट्टेबाज) थेट संपर्कात होते आणि क्रिकेट सट्टा चालवत होते. धक्कादायक बाब म्हणजे, ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी वापरण्यात आलेली काही सिमकार्ड ही इतर निष्पाप व्यक्तींच्या कागदपत्रांचा गैरवापर करून मिळवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.