Home ब्रेकिंग न्यूज छगन भुजबळ आणि माझ्यात वाद नाहीत – सुनील तटकरे

छगन भुजबळ आणि माझ्यात वाद नाहीत – सुनील तटकरे

0
छगन भुजबळ आणि माझ्यात वाद नाहीत – सुनील तटकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात खडाजंगी झाल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असतानाच, या दोन्ही नेत्यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांसमोर येत वादाच्या या सर्व चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. “आमच्यात कोणताही वाद झालेला नाही, आम्ही एकत्र आहोत आणि ‘हम साथ साथ है’,” असे सांगत छगन भुजबळ यांनी पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी किंवा राडा झाला नसल्याचे स्पष्ट केले. तर दुसरीकडे सुनील तटकरे यांनीही या केवळ वावड्या असून लोकशाही मार्गाने पक्षात विविध विषयांवर चर्चा होणे स्वाभाविक असल्याचे सांगत वादाच्या वृत्तावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

https://prahaar.in/2026/05/29/30-countries-including-india-have-a-grand-strategy-for-minerals/

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची, मंत्र्यांची आणि आजी-माजी आमदारांची विधानपरिषद निवडणुका आणि पक्षाच्या बांधणीसंदर्भात एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार आणि कार्यकर्त्यांच्या निधी वाटपावरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले होते. तटकरे यांनी आपल्या मनात साचलेला सगळा राग बाहेर काढत भुजबळांना थेट ऐकवले, तर भुजबळांनीही त्याला रोखठोक प्रत्युत्तर दिल्याची चर्चा दिवसभर रंगली होती.
https://prahaar.in/2026/05/29/thanks-to-the-shinde-committee-1-2-million-applicants-received-certificates-recognizing-them-as-kunbi-maratha/

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी नेहमीच्या शैलीत या चर्चा फेटाळल्या. “बैठकीत अजिबात वाद झालेला नाही. आमदारांना निधी वाटप कसा करायचा, रस्ते आणि इतर विकासकामांबाबत सगळ्यांना कसा न्याय मिळेल, यावर सकारात्मक चर्चा झाली. काही विषयांवर बोलताना मी फक्त एवढंच म्हणालो की, उगीच इकडेतिकडे न भरकटता थेट मुद्द्याचं बोला. याचा अर्थ आमच्यात वाद झाला असा होत नाही. महामंडळांच्या अ, ब, क अशा वर्गीकरणावरही आमचे नेते निर्णय घेतील. पक्षात ‘एकला चलो रे’चा नारा दिला गेल्याची आवई उठवली जात आहे, ती पूर्णपणे चुकीची असून उगीच अफवा पसरवू नका,” असे आवाहन भुजबळांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here