Home अध्यात्म संत एकनाथ

संत एकनाथ

0
संत एकनाथ
sant eknath

अहं वाघ्या सोहं वाघ्या प्रेमनगरा वारी।
सावध होऊनि भजनी लागा देव करा कैवारी।
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी॥
इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारी।
बोध बुथळी ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी॥
आत्मनिवेदन रोडगा निवतीळ हारोहारी।
एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी॥

मराठी संतवाङ्मयात भारुड या काव्यप्रकाराला लोकप्रियता मिळवून दिली ती संत एकनाथांनी. गावगाड्यात वाघ्या, मुरळी, वासुदेव, गोंधळी अशा अनेक भूमिका समाजात वावरत होत्या. संतांनी या लोकसाहित्याचा अभ्यास केला आणि आध्यात्मिक प्रबोधनासाठी त्याचा पुरेपूर उपयोग केला. रूपकात्मक पद्धतीने तत्त्वविचारांची मांडणी करीत मराठीत भारुड या काव्यप्रकाराची निर्मिती झाली. एकनाथांनी या लोकभूमिकांमधून लोकांशी जवळीक साधली आणि बोली भाषेतून आपले विचार मांडून अध्यात्म आणि नीती याबाबत लोकप्रबोधन केले.
या रचनेत संत एकनाथ म्हणतात, “मी वाघ्या, तो वाघ्याही मीच. प्रेमनगरीची वारी करून, सावध भजन करून देवाला आपल्या बाजूने करून घ्या. इच्छा नावाच्या मुरळीच्या नादी लागू नका. नाहीतर नरकात जाऊन पडाल. बोधाचा दिवा आणि ज्ञानाची दिवटी महाद्वारावर पाजळावी. आत्मनिवेदनाचा रोडगा वाहून आपल्या वृत्ती निवावाव्यात.” जनार्दनांचे एकनाथ म्हणतात, “खंडेराय धन्य आहेत, त्यांच्यावर चवऱ्या ढाळाव्यात.”
“मी तोच आणि तोही मीच” हे महावाक्याचे सार आहे. ते भक्तीनेच साध्य होते. ते भक्तीने साधायचे तर प्रेम हवे. म्हणूनच प्रेमनगराची वारी करावी. परस्त्री, धनसंपत्ती ही धोक्याची वळणे आहेत. त्याबाबत नेहमी सावधपणा बाळगावा लागतो. विश्वामित्रही स्त्रीमोहातून सुटले नाहीत. म्हणून सावध राहून भजन करावे. परमेश्वराचे ध्यान करणे हे सततचे भजनच होय. साधनेचे सावधपण देवाला कैवारी करून घेते. अशी ही मल्हारीची वारी असते. मल्हारी म्हणजे आत्माराम. गुरूंनी दिलेला उपदेश नित्य मनी घोळावा, हीच सावधपणाची अवस्था होय. सावधपणा, प्रेमभक्ती आणि बोध यांच्यामुळे जे संचित लाभते ते ज्ञान, ते तेजोमय असते. ज्याचे ध्यान करायचे तो मीच आहे हे कळले की तो म्हणजे मीच म्हणजे वाघ्या. हे ज्ञान झाले की मन पूर्णपणे ईश्वरचरणी लीन होते.

_डॉ . देविदास पोटे   san

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here