Home ब्रेकिंग न्यूज Sanjay Rathore : शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या दालनातून ८० हजार रुपये चोरीला

Sanjay Rathore : शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या दालनातून ८० हजार रुपये चोरीला

0
Sanjay Rathore : शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या दालनातून ८० हजार रुपये चोरीला

मंत्रालयात खळबळ; १० हजारांची मर्यादा असताना इतके पैसे आले कुठून?

मुंबई : कडेकोट बंदोबस्त आणि चोख सुरक्षा व्यवस्था असलेल्या मंत्रालयात चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील शासकीय दालनातून तब्बल ८० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. मंत्रालयासारख्या अतिसुरक्षित इमारतीमध्ये एका कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात असा प्रकार घडल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मंत्रालयाच्या सुरक्षा नियमावलीनुसार, कोणत्याही बाहेरील अभ्यागताला किंवा कर्मचाऱ्याला आपल्यासोबत १० हजार रुपयांपेक्षा जास्त रोकड आत घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांकडून तपासणी दरम्यान या नियमाची कठोर अंमलबजावणी केली जाते. अशा परिस्थितीत मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात नियमापेक्षा आठ पटीने जास्त म्हणजेच तब्बल ८० हजार रुपये आले कुठून आणि इतके पैसे कार्यालयात का ठेवण्यात आले होते? याबाबत आता मंत्रालयाच्या कॉरिडोअरमध्ये उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. कार्यालयातून पैसे गायब झाल्याचे समजताच कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली असून संशयाच्या संदर्भातून रात्री उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली.

पोलिसांत तक्रार नाही

मंत्रालय परिसर हा २४ तास पोलिसांच्या निगराणीखाली असतो, तसेच मंत्र्यांच्या दालनाबाहेर विशेष सुरक्षा रक्षक तैनात असतात. संपूर्ण इमारतीत अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे असतानाही ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची अद्याप कोणतीही अधिकृत पोलीस तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. एवढी मोठी रक्कम चोरीला जाऊनही कायदेशीर प्रक्रिया टाळली जात असल्याने, नेमकी ही रक्कम कोणाची होती आणि कोणत्या कारणासाठी तिथे ठेवली होती, हे लपवण्यासाठीच गुन्हा दाखल न करता केवळ अंतर्गत पातळीवर या प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू असल्याचा संशय बळावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here