Home महाराष्ट्र ठाणे Bakrid 2026 : किरीट सोमय्यांचा थेट इशारा; “मीरा रोडच्या नया नगरमध्ये ‘नवा पाकिस्तान’ करू पाहणाऱ्यांना खपवून घेणार नाही!

Bakrid 2026 : किरीट सोमय्यांचा थेट इशारा; “मीरा रोडच्या नया नगरमध्ये ‘नवा पाकिस्तान’ करू पाहणाऱ्यांना खपवून घेणार नाही!

0
Bakrid 2026 : किरीट सोमय्यांचा थेट इशारा; “मीरा रोडच्या नया नगरमध्ये ‘नवा पाकिस्तान’ करू पाहणाऱ्यांना खपवून घेणार नाही!
Mira bhayandar

मीरा भाईंदर : आगामी बकरी ईदच्या (Bakri Eid) पार्श्वभूमीवर मुंबई नजीकच्या मीरा रोड (Meera Road) येथील पूनम सोसायटीमध्ये (Poonam Society) गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या वादाने आता उग्र रूप धारण केले आहे. कुर्बानीच्या बकरांसाठी उभारण्यात आलेला तात्पुरता शेड आणि त्यानंतर तिथे प्रत्युत्तर म्हणून आणण्यात आलेले डुक्कर, यामुळे हा वाद टोकाला पोहोचला आहे. या धार्मिक आणि सामाजिक संघर्षामुळे संपूर्ण मीरा रोड परिसरात कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

बकरा शेडवरून वादाची ठिणगी

या वादाची सुरुवात पूनम क्लस्टर सोसायटीमधून झाली. येथील मुस्लिम समाजातील काही रहिवाशांनी आगामी सणासाठी कुर्बानीच्या बकरांना ठेवण्याकरिता सोसायटीच्या आवारात एक शेड उभारला होता. मात्र, सोसायटीतील इतर हिंदू रहिवाशांनी निवासी भागात अशा प्रकारे शेड उभारण्यास तीव्र आक्षेप घेतला. रहिवाशांच्या वाढत्या तक्रारींनंतर मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या (MBMC) पथकाने तातडीने कारवाई करत सोमवारी दुपारी हा अनधिकृत शेड जमीनदोस्त केला. परंतु, पालिकेची कारवाई होऊन काही तास उलटत नाही तोच, सोमवारी रात्री पुन्हा एकदा तिथे शेड उभारण्याचे काम सुरू झाल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला. यावरून दोन्ही गट रात्रीच आमनेसामने आले. वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले आणि या धुमश्चक्रीत एका तरुणावर ब्लेडने हल्ला करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/05/26/a-terrifying-experience-for-a-drunk-driver-in-nashik/

सोसायटीत थेट डुक्कर आणल्याने पोलिसांचा लाठीमार

हा सुरू असलेला वाद मंगळवारी दुपारी अधिकच पेटला, जेव्हा हिंदुत्ववादी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी या बकरा शेडला विरोध म्हणून चक्क सोसायटीच्या परिसरात जिवंत डुक्कर आणले. सोसायटीच्या आवारात डुक्कर आणल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच वातावरण कमालीचे संवेदनशील बनले. दोन्ही बाजूंनी जमाव गोळा झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली. अखेर जमावाला पांगवण्यासाठी आणि पूनम सोसायटीत बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून राज्य राखीव पोलीस बल (SRPF) आणि स्थानिक पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.

“नया नगरमध्ये ‘नवा पाकिस्तान’ करू देणार नाही” – किरीट सोमय्यांचा थेट इशारा

या घटनेची माहिती मिळताच भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी तातडीने मीरा रोड येथील पूनम सोसायटीला भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी आणि स्थानिक प्रशासनावर कडाडून टीका केली. “नया नगर परिसरात ‘नवा पाकिस्तान’ तयार करण्याचा कट काँग्रेसकडून सुरू आहे,” असा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी केला. ते पुढे म्हणाले की, “जोपर्यंत या सोसायटीच्या आवारातून सर्व बकरे पूर्णपणे हटवले जात नाहीत, तोपर्यंत मी येथून हलणार नाही. कोणत्याही रहिवासी सोसायटीत उघड्यावर बकरा कापण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. अशा प्रकारे हिंदू समाजाला डिवचण्याचे आणि कायदा हातात घेण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.”

“महागाईवरून लक्ष भरकटवण्यासाठी भाजपचा धार्मिक खेळ” – काँग्रेस नेते नसीम खान यांचा पलटवार

दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी भाजपवर पलटवार करत हा वाद जाणीवपूर्वक पेटवला गेल्याचा आरोप केला आहे. नसीम खान म्हणाले की, “देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी भाजपकडून धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. हिंदू समाजाच्या नावाखाली भाजपच्या संबंधित संघटनांचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत.” प्रशासकीय कारवाईची माहिती देताना त्यांनी सांगितले की, महानगरपालिका आणि पोलिसांनी सामंजस्याने अर्धे बोकड सोसायटीतून सुरक्षित बाहेर हलवले असून उर्वरित प्राणी काढण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले असले, तरी राजकीय नेत्यांच्या एकमेकांवरील आरोपांमुळे मीरा रोडमधील वातावरण अजूनही तापलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here