Home ब्रेकिंग न्यूज Devendra Fadnavis : ‘इंधनाची साठेबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’

Devendra Fadnavis : ‘इंधनाची साठेबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’

0
Devendra Fadnavis : ‘इंधनाची साठेबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’
devendra fadnavis bjp yuva morcha

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या मोठी वाढ झाली आहे. या वाढीव मागणीचा पुरवठा केला जात असतानाही राज्यात कृत्रिम टंचाईसदृश स्थिती निर्माण केली जात असल्याचे समोर आले आहे. ‘शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन इंधनाची साठेबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा साठेबाजांवर नागरी पुरवठा आणि गृहविभागाकडून संयुक्तपणे कडक कारवाई केली जाईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. राज्यातील इंधनाच्या पुरवठ्याची आकडेवारी जाहीर करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या राज्यात पेट्रोलच्या मागणीत सरासरीपेक्षा २३ टक्के, तर डिझेलच्या मागणीत तब्बल ५२ टक्के वाढ झाली असून सरकारकडून त्याचा पुरवठाही केला जात आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये ही वाढ संशयास्पद आहे.
अकोला जिल्ह्यात इंधनाचा खप १५४ टक्क्यांनी वाढला आहे, तर छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, गोंदिया आणि हिंगोली या भागांत ७० टक्क्यांहून अधिक खपत झाली आहे. दुसरीकडे, व्यावसायिक (कमर्शियल) पेट्रोल-डिझेलचा खप मात्र कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी असणारे इंधन व्यावसायिक ठिकाणी वळवून काळाबाजार किंवा साठेबाजी केली जात आहे का? याची सखोल पडताळणी करण्याचे आदेश गृह विभागाला देण्यात आले आहेत.

https://prahaar.in/2026/05/26/western-railway-pre-monsoon-works-completed-by-western-railway/

कांदाप्रश्नी विरोधकांचे अश्रू पुतना मावशीचे

नाशिकच्या चांदवड येथे विरोधकांकडून कांदा प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाचा मुख्यमंत्र्यांनी चांगलाच समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडीने केलेले हे राजकीय आंदोलन आहे. कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, अशी मंडळी आज शेतकऱ्यांसाठी पुतनामावशीचे अश्रू ढाळत आहेत. पण, महायुती सरकार शेतकऱ्यांबाबत अत्यंत संवेदनशील आहे. केंद्र सरकारने कालच कांदा खरेदीचा भाव साडेतीन रुपयांनी वाढवून तो १५ रुपयांपर्यंत केला असून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली आहे. विरोधकांनी त्यांच्या काळात कधी एवढ्या भावाने खरेदी केली होती का, ते दाखवावे. केवळ १५ रुपयांवर न थांबता यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे”, असेही त्यांनी सांगितले.

प्रणिती शिंदेंकडून परिपक्वतेची अपेक्षा नाही

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘प्रणिती शिंदे या पहिल्यांदाच खासदार झाल्या आहेत. यापूर्वी त्या आमदार होत्या. संसदेत गेलेल्या लोकप्रतिनिधींनी परिपक्वतेने बोलणे अपेक्षित असते. मात्र, कुणी जाणीवपूर्वक अपरिपक्वता दाखवत असेल आणि आपण कुणाबद्दल, काय बोलतोय याचे भान ठेवत नसेल, तर अशा नेत्यांना राज्यातील जनताच त्यांची योग्य जागा दाखवून देईल.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here