स्वप्न…

0
स्वप्न…
speech

कथा – रमेश तांबे

नील घाईघाईने शाळेत निघाला होता. आज शाळेत पाहुणे येणार होते. त्या पाहुण्यांची ओळख करून देण्याचे काम नीलकडे होते. पाहुण्यांच्या आधी अर्धा तास शाळेत ये असा सल्ला वर्गशिक्षकांनी नीलला दिला होता. पण उद्या काय आणि कसे बोलायचे, आपल्याला नीट जमेल ना या विचाराने त्याला लवकर झोप लागलीच नाही. मग सकाळी उशिरा उठून शाळेत निघेपर्यंत नीलला चांगलाच उशीर झाला होता.

रस्त्यातली वाहने कशीबशी चुकवत, ओळखीच्या आजी-आजोबांना टाळत तो धावतच शाळेत पोहोचला. घाईघाईने वर्गात शिरला. पण वर्गात मुलेच नव्हती. त्यानं ओळखलं की सर्व मुले सभागृहात गेली असणार. अन् तिथली भाषणेदेखील सुरू झाली असतील. शाळेचे सभागृह तिसऱ्या मजल्यावर होते. नील धावत पळत सभागृहात पोहोचला. तोच टाळ्यांचा कडकडाट झाला. कारण पाहुणे, मुख्याध्यापक, इतर मान्यवर, शिक्षक मंडळी त्याच्या मागेच उभी होती.

नीलला बघताच पाटील सर म्हणाले, “बरे झाले आलास,” आता जा लवकर, व्यासपीठाच्या मागे जाऊन उभा राहा. पाचच मिनिटांत तुला व्यासपीठावर जाऊन पाहुण्यांची ओळख करून द्यायची आहे. नीलच्या छातीचे ठोके आता वाढू लागले. नील व्यासपीठामागे गेला. तेथील एका स्वयंसेवक विद्यार्थ्याने त्याच्या छातीवर एक भलामोठा कापडी बिल्ला लावला.

आता कार्यक्रम सुरू झाला. सूत्रसंचालकाने स्वागत, दीप प्रज्वलन यथासांग पार पाडले. अन् पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी ‘नील सावंत’ याला विनंती करतो असे म्हणत सूत्रसंचालक बाजूला झाला. नील मोठ्या ऐटीत व्यासपीठावर गेला आणि खिशातला पाहुण्यांच्या परिचयाचा कागद काढण्यासाठी हात घातला. पण हाय रे दैवा! खिशातून कागद निघाला, पण तो आईने रात्री दुकानातून आणायला सांगितलेल्या सामानाच्या यादीचा होता. आता मात्र नीलला चांगलाच घाम फुटला. पण नील डगमगला नाही. कारण नील तसा हजरजबाबी होता. शिवाय काल तो दिवसभर पाहुण्यांचा परिचय वाचत होता. त्यामुळे हातात कागद नसतानाही नील पाहुण्यांची छान ओळख करून देऊ लागला. समर्पक अशा कवितांच्या ओळी आणि संस्कृत सुभाषितांचा वापर त्याने केला आणि खूप छान अशी पाहुण्यांची ओळख त्याने श्रोत्यांना करून दिली. स्वतः पाहुण्यांनीदेखील मोठ्या कौतुकाने टाळ्या वाजवून नीलचे कौतुक केले.

तीन-चार मिनिटांतच ओळख पूर्ण करून नील बाजूला झाला. सत्कारानंतर पाहुण्यांनी नीलला बोलावले. पाठीवर हात फिरवत, स्वतःला मिळालेली शाल नीलच्या पाठीवर पांघरली आणि पुष्पगुच्छही दिला. नील खूपच खूश झाला. त्या कौतुकाच्या गडबडीत नील व्यासपीठावरून खाली उतरताना पायऱ्यावरून पाय घसरून खाली पडला. तोच बस कंडक्टर ओरडला, “अरे ये पोरा, काय रे चालत्या गाडीतून उतरायचं नसतं हे शिकलास नाही वाटतं. आता पडलास ना भर रस्त्यात उताणा!” नीलने डोळे उघडले. पाहातो तर काय! समोरच शाळेचे प्रवेशद्वार होते आणि पाहुण्यांना पाहण्यासाठी मुलांचा घोळका दूरवर उभा होता. त्यांना बघताच नील पुटपुटला, “अरेच्चा प्रवासातच स्वप्न पडलं वाटतं.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here