Home ब्रेकिंग न्यूज राज्यात अचानक इंधन मागणीत ३० टक्के वाढ

राज्यात अचानक इंधन मागणीत ३० टक्के वाढ

0
राज्यात अचानक इंधन मागणीत ३० टक्के वाढ
Chief Minister Devendra Fadnavis

 मुख्यमंत्र्यांना साठेबाजीचा संशय, जिल्हाधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : देशभरात गेल्या आठ दिवसांत तिसऱ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य होरपळत असतानाच, राज्यातील ग्रामीण भागात आता गंभीर इंधन टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांना डिझेल मिळेनासे झाल्याने ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. “राज्यात अचानक पेट्रोल-डिझेलच्या मागणीत २० ते ३० टक्क्यांनी झालेली वाढ संशयास्पद असून, यात काहीतरी मोठी गडबड असण्याची शक्यता आहे,” अशी शंका व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी अवैध साठेबाजांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

शनिवारी शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामीण भागातील इंधन टंचाई आणि वाढत्या गर्दीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “बळीराजाला ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल कमी पडू नये, ही सरकारची प्राथमिकता आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत अचानक मागणीत ३० टक्क्यांपर्यंत झालेली वाढ सामान्य नाही. शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी इंधनाची अवैध साठेबाजी किंवा काळाबाजार करत असेल, तर त्यांची अजिबात गय केली जाणार नाही.”

ग्रामीण भागातील गोंधळ आणि गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने आता ‘स्मार्ट’ मार्ग निवडला आहे. काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर किंवा कृषी पंपांचे ‘आरसी बुक’ तपासूनच डिझेल देण्यास सुरुवात केली आहे. हाच पॅटर्न आता राज्यभरात प्रभावीपणे राबवण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. खऱ्या शेतकऱ्यांना त्रास न देता केवळ गरजू लाभार्थ्यांपर्यंतच इंधन पोहोचावे, यासाठी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

पेट्रोल-डिझेलसाठी मोठमोठ्या रांगा

इंधन टंचाईच्या भीतीने वाशीम, हिंगोली, परभणी आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपांवर कॅन, ड्रम आणि बाटल्या घेऊन नागरिकांच्या मैलोनमैल रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी वाद आणि हाणामारीच्या घटना घडत आहेत. तर दुसरीकडे, इंधनाच्या दरांचा भडका उडालेलाच आहे. शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल ८७ पैशांनी तर डिझेल ९१ पैशांनी महागले आहे. गेल्या दहा दिवसांतील ही तिसरी मोठी दरवाढ ठरल्याने शेतीचा उत्पादन खर्च वाढण्याच्या चिंतेने बळीराजा पुरता खचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here