अहिल्यानगर : मुंबईत कलिंगड खाऊन विषबाधा झाल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. पण मृतांच्या शरीरात उंदीर मारण्याचे औषध आढळले आणि विषबाधेचे कारण वेगळे असल्यामुळे पोलीस तपासाची दिशाच बदलली. या घटनेला काही दिवस होत नाहीत तोच अहिल्यानगर जिल्ह्यात पाकिटबंद आमरस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्यांमध्ये एक चार वर्षांची चिमुरडी आहे.
https://prahaar.in/2026/05/23/weather-update-rain-in-mumbai-pune-in-the-next-48-hours-however-heat-wave-conditions-will-continue-in-vidarbha/
वेळेत उपचार मिळाल्यामुळे विषबाधा झालेल्या सात जणांपैकी सहा जणांना तीन दिवसांनंतर डॉक्टरांनी घरी जाण्याची परवानगी दिली आहे.
https://prahaar.in/2026/05/20/watermelon-death-case-mumbai-family-news-update/
विषबाधा झालेल्या सर्वांना आमरस खाल्ल्यानंतर चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. कुटुंबातील एक व्यक्ती जेवणासाठी उशिरा आली त्यामुळे इतरांना त्रास झाल्याचे त्या व्यक्तीच्या लक्षात आले. या व्यक्तीनेच विषबाधा झालेल्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी धावपळ केली. बेशुद्ध पडलेल्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळेच परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली.
https://prahaar.in/2026/05/23/journey-of-sais-shirdi-from-devotion-to-artillery/
आमरस खाल्ल्याने विषबाधा झालेल्यांवर एशियन हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. या हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सचिन पांडुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आमरस तयार करण्यासाठी वापरलेले आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यात आले होते. हे आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. या कॅल्शियम कार्बाईडचाच परिणाम झाला आणि आमरस विषारी झाला असा संशय डॉक्टर सचिन पांडुळे यांनी व्यक्त केला.
नागरिकांनी शक्यतो नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे खावे. बाजारातून आणलेले आंबे पाण्याने स्वच्छ धुवावे. नंतरच खावे, असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.