Home ब्रेकिंग न्यूज 10% water cut in Mumbai : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! मुंबईत केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक; जुलै-ऑगस्टच्या नियोजनासाठी पालिकेची धावपळ

10% water cut in Mumbai : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! मुंबईत केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक; जुलै-ऑगस्टच्या नियोजनासाठी पालिकेची धावपळ

0
10% water cut in Mumbai : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! मुंबईत केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक; जुलै-ऑगस्टच्या नियोजनासाठी पालिकेची धावपळ
Mumbai Water Cut

मुंबई : मुंबईकरांवर सध्या पाणीटंचाईचे गडद संकट (Mumbai’s seven lakes remain under pressure) घोंघावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील खालावत जाणारी पातळी पाहता, १५ मे पासून संपूर्ण मुंबईत महानगरपालिकेने १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र, या कपातीनंतरही तलावांमधील पाण्याचा ताण कमी झालेला नाही. शुक्रवारी सकाळी हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईची तहान भागवणाऱ्या सातही तलावांमध्ये आता केवळ १९.२२ टक्के एवढाच जिवंत पाणीसाठा (Live Water Stock) शिल्लक राहिला आहे. मुंबईच्या धरणांची एकूण साठवण क्षमता १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतकी अवाढव्य आहे, मात्र सध्या या सर्व जलाशयांमध्ये मिळून फक्त २,७८,१९९ दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे.

कपात नसती तर…

https://prahaar.in/2026/05/23/mumbais-garib-nagar-demolition-drive-enters-final-day-today-debris-clearance-underway-at-bandra-east/

मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) दररोज शहराला साधारणपणे ३,९५० ते ४,१०० दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, पाणीकपातीचा निर्णय लागू झाल्यापासून हा दैनंदिन पुरवठा ३,६०० ते ३,७५० दशलक्ष लिटरपर्यंत खाली आणण्यात आला आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पालिकेने वेळीच ही १० टक्के कपात लागू करून पाण्याचे नियोजन केले नसते, तर सध्या उपलब्ध असलेला हा पाणीसाठा केवळ जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच पुरला असता आणि त्यानंतर संपूर्ण शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाला असता.

हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर पालिकेकडून खबरदारी

पालिकेने उन्हाळ्याच्या अखेरीस पाणीकपातीचा हा निर्णय घेण्यामागे यंदाचा मान्सूनचा अंदाज हे मुख्य कारण आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) कमकुवत राहण्याची आणि पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तवली आहे. पावसाने दडी मारल्यास भविष्यात पाण्याचे गंभीर संकट उभे राहू नये, यासाठी अत्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने उपलब्ध पाणीसाठा अत्यंत काटकसरीने वापरण्यास सुरुवात केली आहे.

१७ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट

सध्या शिल्लक असलेला पाणीसाठा कोणत्याही परिस्थितीत किमान १७ ऑगस्टपर्यंत पुरावा, असे पालिकेचे उद्दिष्ट आहे. पाण्याचे हे गणित जुळवण्यासाठी आणि मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी, महापालिकेने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे धाव घेतली आहे. बीएमसीने वैतरणा आणि भातसा धरणांमधील अतिरिक्त २३७ दशलक्ष घनमीटर राखीव पाणीसाठा वापरण्याची रीतसर परवानगी मागितली आहे. दरम्यान, यंदा पाणीसाठा कमी असला तरी, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सद्यस्थिती किंचित बरी असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. २२ मे २०२५ रोजी तलावांमध्ये १६.८८ टक्के, तर २०२४ मध्ये याच काळात केवळ १०.६७ टक्के इतकाच पाणीसाठा होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा मुंबईत मान्सूनचे आगमन १० जून रोजी होऊ शकते. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी (२०२५ मध्ये) मान्सून वेळेपूर्वीच म्हणजे २५ मे रोजीच मुंबईत दाखल झाला होता.

मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा कणा असणारे सात तलाव

मुंबई या महानगराची तहान भागवण्याची मुख्य भिस्त भातसा, अप्पर वैतरणा, मिडल वैतरणा, मोडक सागर, तानसा, विहार आणि तुळशी या सात प्रमुख तलावांवर असते. हे सातही जलाशय मुंबईच्या पाणी वितरणाचे मुख्य स्रोत आहेत. पाण्याची बचत करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असले तरी, धरणांची पातळी अजूनही समाधानकारक नाही. त्यामुळे जोपर्यंत मुंबईत मान्सूनच्या दमदार पावसाला सुरुवात होऊन धरणे भरण्यास सुरुवात होत नाही, तोपर्यंत महापालिका प्रशासन पावसाचे प्रमाण आणि पाण्याच्या उपलब्धतेवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here