Home ब्रेकिंग न्यूज CBI : शुभम खैरनारची पुण्यात सीबीआयकडून सखोल चौकशी

CBI : शुभम खैरनारची पुण्यात सीबीआयकडून सखोल चौकशी

0
CBI : शुभम खैरनारची पुण्यात सीबीआयकडून सखोल चौकशी

पुणे : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात नाशिक येथून अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी शुभम खैरनार याला सीबीआयने पुण्यात आणले आहे. गुरुवारी त्याला पुण्यातील फुलेनगर येथील सीबीआय कार्यालयात ठेवून त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. खैरनारला अटक केल्यानंतर सुरुवातीला तपासासाठी दिल्लीला नेण्यात आले होते. दरम्यान, खैरनारचे पुण्यातील कोणत्या लोकांशी संपर्क होते, याची संपूर्ण यादी सीबीआयने तयार केली असून त्या दिशेने तपास सुरू आहे. याच प्रकरणातील इतर दोन महिला आरोपी प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे या सध्या सीबीआय कोठडीत आहेत. या दोन्ही आरोपींना शुभम खैरनारच्या समोरासमोर बसवून सीबीआयचे अधिकारी त्यांची एकत्रित चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या कात्रज परिसरातील एकाच सोसायटीत राहतात. त्यांनी परीक्षेपूर्वी कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे ‘विशेष वर्ग’ (स्पेशल क्लास) घेतले होते, याची माहिती सीबीआयचे पथक गोळा करत आहे. याशिवाय, गैरव्यवहाराचे पुरावे गोळा करण्यासाठी या दोन्ही महिला आरोपींच्या हस्ताक्षरांचे (Handwriting) नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

दिल्ली सीबीआयचे पथक पुण्यात;

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता मोठी गती आली असून, दिल्ली सीबीआयचे विशेष पथकही पुण्यात दाखल झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सीबीआय महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये संशयित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची कसून चौकशी करत आहे. पुणे, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूर या ठिकाणच्या काही विद्यार्थ्यांनी पेपर खरेदी केल्याचा दाट संशय तपास यंत्रणेला आहे. याच संशयावरून गुरुवारी सीबीआयने पुणे आणि परिसरातील काही विद्यार्थी व त्यांच्या पालकांना कार्यालयात बोलावून त्यांची चौकशी केली. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध आता घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here