नांदेड : NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरात खळबळ उडालेली असतानाच आता महाराष्ट्रातील नांदेड शहर पुन्हा चर्चेत आले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या NEET परीक्षेतील गैरप्रकारांचा तपास सध्या केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) करत असून, हा तपास दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नाशिक, पुणे, अहिल्यानगर, लातूर यानंतर आता सीबीआयचे (CBI) पथक नांदेडमध्ये दाखल झाले असून, येथे एका खासगी कोचिंग क्लासच्या जाहिरातीमुळे संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणात संबंधित क्लासमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची सीबीआयकडून रविवारी सखोल चौकशी करण्यात आली.
https://prahaar.in/2026/05/18/dcm-eknath-shinde-on-ladki-bahin-yojana/
नांदेडमध्ये सध्या खासगी कोचिंग क्लासेसमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लासेसकडून आपल्या विद्यार्थ्यांच्या यशाची मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी केली जाते. मात्र, अशाच एका जाहिरातीमुळे आता एका नामांकित क्लासेसवर तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. संबंधित क्लासने NEET परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच एका विद्यार्थिनीने केमिस्ट्री विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवल्याचा दावा करत जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही जाहिरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आणि त्यानंतर सीबीआयने (CBI) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
सीबीआयच्या पथकाने चौकशी केलेल्या विद्यार्थिनीने केमिस्ट्री विषयात १८० पैकी १८० गुण मिळवल्याचा दावा जाहिरातीत करण्यात आला होता. या विद्यार्थिनीचा फोटो वापरून क्लासेसने स्वतःची प्रसिद्धी केली होती. मात्र, तपासादरम्यान या विद्यार्थिनीच्या वडिलांनी तब्बल ५ लाख रुपये देऊन NEET परीक्षेचा पेपर खरेदी केल्याचा आरोप समोर आला आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.
https://prahaar.in/2026/05/18/municipal-commissioner-ashwini-bhide-takes-initiative-for-fuel-conservation/
विशेष म्हणजे, नीट परीक्षेचा अधिकृत निकाल लागण्यापूर्वीच संबंधित क्लासने विद्यार्थिनीला पूर्ण गुण मिळाल्याचा दावा केल्यामुळे संशय अधिक गडद झाला आहे. या जाहिरातीत आणखी दोन विद्यार्थ्यांचे फोटो देखील प्रकाशित करण्यात आले होते. त्यामुळे केवळ विद्यार्थिनीच नव्हे तर संबंधित कोचिंग क्लासचे चालक आणि व्यवस्थापनही तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.
दरम्यान, नीट परीक्षा पार पडल्याच्या काही दिवसांतच पेपरफुटी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवला. तपासादरम्यान महाराष्ट्रातील अनेक आरोपी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. नाशिकमधील शुभम खैरनार याने नीटचा पेपर फोडल्याचा आरोप असून, त्यानंतर धनंजय लोखंडे याने विद्यार्थ्यांना तो पेपर विकल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांना शोधण्याची जबाबदारी पुण्यातील ब्युटिशियन मनीषा वाघमारे हिच्याकडे होती, असा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे.