Home साप्ताहिक कोलाज पृथ्वी मोलाची

पृथ्वी मोलाची

0
पृथ्वी मोलाची

ललित – डॉ. निर्मोही फडके

सामुद्रधुनी’ हा शब्द लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचला. त्या वयात वाचनात नवा शब्द सापडला की, एखादा मोती सापडल्याचा आनंद होत असे. या शब्दाच्या बाबतीतही असंच झालं. मुळात समुद्र लाडकाच होता. अर्थात तो जितका हवासा वाटायचा, तितकंच त्याचं भयही वाटायचं. त्याच्यासमोर गेलं की, एखाद्या महर्षीपुढे आपण उभे आहोत आणि तो केव्हाही संतप्त होऊन आपल्याला शाप देईल किंवा अजस्र लाटांनी गिळून टाकेल असं वाटे. हा कदाचित पौराणिक कथा वाचल्याचा परिणाम असावा. पण म्हणून आमची एकजात सगळी पिढी (विशेषतः मराठी माध्यमातली) ना भितरी झाली, ना पापभिरू. अद्भुताचं असं आयुष्यात असणंही त्या वयासाठी आवश्यक होतं. येत असे समुद्र आमच्या स्वप्नात कधी देवताही होऊन, नि येत असे नरसिंहही एखादा खांब फोडून बाहेर, तर कधी स्वप्नात पुष्पक विमानातून फिरल्याचाही अनुभव मिळत असे, तर कधी सात बुटकेही रानावनांत भेटत असत. आता ‘कुणी क्ष’ म्हणतील, ही तुमची ‘बालभारती’ स्वप्नं. पण मग त्याला इलाज कोणता होता, हेही त्या ‘कुणी क्ष’नीच सांगावं. असो. विषय जरा भरकटला.

तर सामुद्रधुनी. या शब्दात समुद्रचं सामुद्र रूप का झालं, हे संस्कृत व्याकरण नंतर कळलं. मात्र धुनी हा शब्द अगदीच नवीन होता. तेव्हा थोडा गूढही वाटला तो. भूगोलाच्या शिक्षकांनी सामुद्रधुनीचा शब्दकोशानुसार अर्थ सांगितला, ‘पाण्याच्या दोन मोठ्या भागांना जोडणारी पाण्याची चिंचोळी पट्टी’.

भूगोलाच्या धड्यात असलेली ‘जिब्राल्टरची सामुद्रधुनी’. स्पेन आणि मोरोक्को या दोन देशांमधली. भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारी. उगीच आवडली. तिच्या कोपऱ्यावर स्पेनच्या किनाऱ्यावर असलेल्या जिब्राल्टरच्या खडकाबद्दल वाचलेल्या कथेसकट. त्या खडकाला आणि त्याच्या समोर असलेल्या मोरोक्कोच्या खडकाला आधी ‘हर्क्युलिसचे स्तंभ’ असं नाव होतं. तेही गूढ वाटलं. ग्रीक पुराणकथांसारखं. ८ व्या शतकात तारिक ह्या अरबी सेनापतीनं मोरोक्कोतून आक्रमण करून स्पेन काबीज केला. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ अरबी लोकांनी या खडकाला ‘जेबेल ए तारिक’ असं नाव दिलं. ज्याचा अपभ्रंश स्पॅनिश भाषेत जिब्राल्टर असा झाला. एकुणात ही सामुद्रधुनी त्या शालेय वयात अपूर्वाईची वाटली.

मात्र धुनीबद्दल एक अनोखी माहिती नंतरच्या अभ्यासात (स्वयं अध्ययनात) कळली, आणि धुनीबद्दलचं गूढ अधिकच वाढलं. धुनीचा संस्कृतमधला अर्थ आहे नदी, तर हिंदी भाषेतला अर्थ आहे, गोवऱ्यांची आगटी. केवढे हे परस्परविरोधी अर्थ? असं विरुद्धार्थी असणंच तर सौंदर्यनिर्मिती करतं आणि म्हणूनच भाषांच्या अंतरंगात शिरणं मोहवतं.

समुद्र आणि त्याला जोडून येणारी त्याची नदीसारखी चिंचोळी पट्टी, अशी ही दोघं नंतरच्या जगण्यात कायमच मनतळीशी रुतून बसली होती. एखाद्या जहाजानं नांगर टाकून ठेवावा तशी. केव्हातरी मराठी वृत्तपत्रांत एखाद्या जागतिक विषयावरच्या बातमीत हा शब्द वापरलेला दिसायचा. त्या जागतिक बातमीशी आपलं देणं ना घेणं, या भावनेनं तेवढ्यापुरताच वाचला जायचा. काही वर्षांपूर्वी एका ललित लेखात ‘धुनी’ शब्द नदी या अर्थानं वापरताना लेखक म्हणून मनाला वेगळंच समाधान मिळालं, कारण त्या लेखातली नदी होतीच तशी गूढ. तसं पाहिलं तर कोणतीही लहान-मोठी नदी गूढच असते, तिच्या तिच्या एखाद्या कहाणीसह. हिंदीत धुनी हा शब्द अग्नी या अर्थानं वापरला जातो, हे शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात अहोरात्र प्रज्वलित असलेल्या धुनीबद्दल ऐकलं, तेव्हा सोदाहरण लक्षात आलं.

तर अशी ही कधीही न पाहिलेली, अनुभवलेली ‘सामुद्रधुनी’ आयुष्याच्या मध्याहनीला एका वेगळ्याच रूपात आपल्यासमोर उभी ठाकेल असं काही वाटलं नव्हतं. दोनेक महिन्यांपूर्वी सुदूर आखाती देशांत अमेरिकेनं कुरबुरी सुरू केल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली, तेव्हा त्यांच्याकडे ‘लांडगा आला रे’ या गोष्टीतल्या मुलाप्रमाणे माझ्यासारख्या अनेकांनी दुर्लक्ष केलं. कारण अशा बातम्या काही काळाच्या अंतरानं येतंच असतात. अहो, किती नि कुठे कुठे लक्ष ठेवायचं आपण? किती संवेदना व्यक्त करायच्या? संवेदनशील, संवेदनशील म्हणता म्हणता आता इतके बधीर झालो आहोत, की संवेदना म्हणजे नक्की काय नि त्या कशाबद्दल असाव्यात हेच कळेनासं झालं आहे. म्हणजे थोडक्यात असं की, ‘आता आपल्या इथलं तापमान ५० चा पारा गाठणार आहे, तेव्हा आपल्या भोवताली असणाऱ्या चिमण्या-पाखरांच्या जगण्यापासून ते थेट इतिहासातल्या बखरी खरं सांगतात की, सोशल मीडियावरचे गाढे राजकारणी? इथपर्यंत, व्हाया आपल्या नाशकातली ग्रेट प्रकरणं नि महिला आयोग, इतका आपल्या राज्यस्तरीय संवेदनशीलतेचा फुगवटा झालेला आहे. त्याला जोडलेला एक फुगा आहे राष्ट्रीय पातळीवरच्या संवेदनशीलतेचा, जो आसेतुहिमाचल धर्म की कर्म करत फुगलेला आहेच, तर अशा या सगळ्या संवेदनाधिष्ठित आयुष्यात हे इंटरनॅशनल संवेदना प्रकरण भरीस भर म्हणून आलं आणि आता याबाबतीत संवेदनशील कसं बरं राहावं, या विचारात आम्ही तमाम अखिल भारतीय संवेदनशील महामंडळाचे सभासद पडलो. (म्हणजे खरंच ‘पडलो’. हा लेखही त्याचाच एक पुरावा.)

असो. तर विषय आहे ‘सामुद्रधुनी’चा. अमेरिका-इराण प्रकरण उद्भवलं आणि गेले कित्येक दिवस हा शब्द भोवताली रुंजी घालू लागला. शाळेतल्या भूगोलानं नास्ताल्जिक केलंच. ‘जिब्राल्टरची सामुद्रधुनी’ तेव्हा पाठ केली होती, आता हे ‘होर्मुझ’ प्रकरण अभ्यास न करता रोज ऐकून ऐकूनच पाठ झालं. इराणचं आखात आणि ओमानचं आखात यांना जोडणारी ही सामुद्रधुनी. याच धुनीतून, ओमानच्या आखातातून पुढे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात शिरता येतं. आखाती देशांकडून मिळणाऱ्या तेलाचा २० ते २५ टक्के जागतिक व्यापार जिथून चालतो, तो जगातला एक संवेदनशील जलमार्ग, होर्मुझ सामुद्रधुनी. जिब्राल्टरला जसा एक नैसर्गिक खडक-स्तंभ आहे, तसं इथे ओमानचं एक बेट आहे, मुसंदम. पण ओमानपासून जरा विलग झालेलं. ओमान आणि इराण यांच्या सीमा इथेच सगळ्यात जास्त जवळ आल्यामुळे इथे ती ‘पाण्याची सर्वाधिक चिंचोळी पट्टी’ नैसर्गिकरीत्या तयार झाली आहे. त्यात पुन्हा निसर्गानंच मारलेली मेख अशी की, ओमानच्या बाजूला समुद्राची पातळी अधिक खोल असल्यानं जहाजांची वाहतूक तिथून अधिक सुकर होते. आपल्या भारताकडे येणारा तेलसाठा हा याच धुनीतून येतो, त्यामुळे आपल्यासाठी ही सामुद्रधुनी एक प्रकारे आपली जीवनवाहिनी बनली आहे, असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच आपल्यासाठी हा विषय संवेदनशील ठरतो.

या युद्धविषयात अनेक असे मुद्दे आहेत, जे आपल्या अनेकांच्या मर्यादेबाहेरचे आहेत. जागतिक व्यापार, अर्थव्यवस्था आणि राजकारण याबद्दल तज्ज्ञांनीच बोलावं, लिहावं. पण सध्या आपल्याकडे बोलघेवड्या तज्ज्ञांच्या आणि शब्दसम्राट लेखकांच्या पलटणीच्या पलटणी – सगळ्याच विषयांत – दिसून येत आहेत. आता या सगळ्या ‘ई-कचऱ्या’ची आपण कुठल्या आकाशगंगेत, कशी विल्हेवाट लावणार आहोत, कोण जाणे? असो. तर ही होर्मुझची धुनी. तिथल्या बातम्या वाचताना आज हा ‘धुनी’ शब्द खऱ्या अर्थानं शब्दशः अंगावर शहारे उभे करत आहे. आज ही ‘धुनी’ अग्निप्रलयात जळत आहे. धगधगत आहे. या ‘पाण्याच्या चिंचोळ्या पट्टीची’, ‘गोवऱ्यांची आगटी’ झालेली आपण पाहत आहोत. हे मानवतेला दीन करणारं चित्र जगाच्या कॅन्व्हासवरून कधी पुसलं जाईल? एकाच शब्दाचे दोन भारतीय भाषांमधले विरुद्धार्थ हे आपल्या भाषांचं सौंदर्य असले, तरी ते अशा प्रकारे समानार्थी होताना अनुभवणं, हे मानवी बुद्धीची कुरूपता अनुभवणं आहे, असं सध्या प्रत्येक क्षणी वाटत आहे.