गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ या मोहिमेला मोठे यश आले आहे. पोलिसांनी जिल्ह्यात सक्रिय असलेल्या सर्व ८ नक्षलवाद्यांना अटक केली असून, ३८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या आणखी ५ नक्षलवाद्यांनी शनिवारी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्हा आता पूर्णत: नक्षलमुक्त झाला आहे.
https://prahaar.in/2026/05/16/patel-and-tatkare-retain-their-posts-ncp-to-soon-send-a-new-letter-to-the-election-commission/
अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये कंपनी क्रमांक १० चा विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला, जयराम गावडे, मुकेश अवलाम, विजय तामो, रजिता मडावी, ज्योती पोटावी आणि आमती पोडियाम यांचा समावेश आहे. या सर्वांवर शासनाने एकूण ६४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांनी या आरोपींकडून एके-४७, एसएलआर आणि अन्य बंदुकांसह ६५ लाख ३४ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
https://prahaar.in/2026/05/16/monsoon-arrives-in-the-andamans-ahead-of-schedule-arrival-of-rain-forecast-in-maharashtra-between-june-2-and-5/
७ फेब्रुवारी २०२६ रोजी भामरागड जवळील फोदेवाडा जंगलात झालेल्या चकमकीत एक पोलीस जवान शहीद झाला होता. या हत्येमध्ये अटकेतील काही नक्षलवाद्यांचा सहभाग होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी यातील ४ जणांना तेलंगणातून, दोघांना कुमनार येथून आणि दोघांना नैताळा येथून अटक केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी पत्रकार परिषदेत दिली.
https://prahaar.in/2026/05/16/heatwave-in-mumbai-thane-palghar-and-raigad/
दुसरीकडे, पोलिसांसमोर शरणागती पत्करलेल्या ५ नक्षलवाद्यांमध्ये एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि दोन दलम सदस्यांचा समावेश आहे. मधु उर्फ राकेश वेळदा, जीवन उर्फ जग्गू मडकाम, रजनी उर्फ दुर्गा धुर्वा, मंगली कुरसाम आणि लक्ष्मी पुनेम अशी आत्मसमर्पण केलेल्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांविरुद्धचा सशस्त्र संघर्ष संपला असल्याचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले. मात्र, नक्षलवादी विचारधारा लगेच संपत नसल्यामुळे, इतर राज्यांतून नक्षलींनी जिल्ह्यात पुन्हा प्रवेश करू नये यासाठी पोलीस यापुढेही सातत्याने लक्ष ठेवून राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.