Home ब्रेकिंग न्यूज Dileep Raj Passes Away : कन्नड सिनेसृष्टीला मोठा धक्का; लोकप्रिय अभिनेते दिलीप राज काळाच्या पडद्याआड

Dileep Raj Passes Away : कन्नड सिनेसृष्टीला मोठा धक्का; लोकप्रिय अभिनेते दिलीप राज काळाच्या पडद्याआड

0
Dileep Raj Passes Away : कन्नड सिनेसृष्टीला मोठा धक्का; लोकप्रिय अभिनेते दिलीप राज काळाच्या पडद्याआड
Dileep Raj death

कर्नाटक :  कन्नड सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते दिलीप राज (Dileep Raj) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण कन्नड मनोरंजनविश्व हादरले असून चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

कन्नड चित्रपटसृष्टीने एक गुणी अभिनेता गमावला आहे. अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे दिलीप राज यांनी चित्रपट आणि छोट्या पडद्यावर अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीत शोककळा पसरली. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दिलीप राज (Dileep Raj) यांनी कन्नड चित्रपटसृष्टीसोबतच कन्नड टेलिव्हिजन क्षेत्रातही मोठं योगदान दिलं होतं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास २५ चित्रपटांमध्ये काम केलं असून अनेक लोकप्रिय कन्नड मालिकांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ‘बॉयफ्रेंड’ (Boyfriend) या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘लव्ह मॉकटेल ३’ (Love Mocktail 3), ‘मिलाना’ (Milana), ‘टोनी’ (Tony), ‘ऑर्केस्ट्रा म्हैसूर’ (Orchestra Mysuru), ‘यू टर्न’ (U Turn), ‘मींचगी नी बारालू’ (Minchagi Nee Baralu) आणि ‘हिटलर कल्याण’ (Hitler Kalyana) यांसारख्या अनेक गाजलेल्या प्रोजेक्ट्समध्ये अभिनय करत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं.

कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि व्हॉइस आर्टिस्ट रवी शंकर (Ravi Shankar) यांनीही दिलीप राज यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितलं की, “दिलीपला कोणत्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. तो ना मद्यपान करायचा, ना धूम्रपान.” पुढे बोलताना रवी शंकर म्हणाले, “दिलीपच्या निधनाची बातमी माझ्यासाठी अतिशय धक्कादायक आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार अनुभवले. सुरुवातीला तो कन्नड टीव्ही क्षेत्रात काम करत होता. मात्र चित्रपटातून ऑफर आल्यामुळे त्याने छोटा पडदा सोडला. पण चित्रपटसृष्टीत अपेक्षित यश मिळालं नाही आणि त्याला पुन्हा टीव्हीकडे वळावं लागलं. त्यानंतरही त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या.”

रवी शंकर यांनी पुढे दिलीप राज यांच्या संघर्षमय आयुष्याबद्दल सांगताना म्हटलं की, “एक काळ असा होता की त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. घरखर्च भागवण्यासाठी त्यांना स्वतःची महागडी घड्याळं आणि परफ्यूम विकावे लागले होते.” या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये अधिक हळहळ व्यक्त केली जात आहे.

https://prahaar.in/2026/05/13/acharya-pralhad-keshav-atre-rangmandir-bad-condition/

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दिलीप राज (Dileep Raj) यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधत बुधवारी सकाळची अपॉइंटमेंटही घेतली होती. मात्र सकाळ होण्याआधीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रामनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here