Home ब्रेकिंग न्यूज Amol Mitkari : १४ मेपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात!

Amol Mitkari : १४ मेपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात!

0
Amol Mitkari : १४ मेपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात!
Sunetra Pawar and Amol Mitkari meeting

अमोल मिटकरींनी आमदारकीच्या शेवटच्या दिवशी सुनेत्रा पवारांची घेतली भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचा आमदारकीचा कार्यकाळ बुधवार, १३ मे रोजी संपुष्टात आला आहे. या पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत, ‘१४ मेपासून एका नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणार’ असल्याचे म्हटले आहे. आमदारकीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.

आपल्या भावना व्यक्त करताना मिटकरी म्हणाले की, “आजचा दिवस हा संघर्ष, वादळे आणि अनेक शिकवणींनी भरलेल्या एका मोठ्या राजकीय टप्प्याचा समारोप आहे. गेल्या सहा वर्षांत अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. टीका झाली, संघर्ष करावा लागला आणि अनेकदा एकटेपणाही वाट्याला आला; मात्र महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास हेच माझे बळ ठरले.”

https://prahaar.in/2026/05/13/provide-infrastructure-facilities-immediately-in-the-project-affected-settlements-in-mahul-standing-committee-chairman-directs-the-administration/

आपल्या राजकीय प्रवासात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या संधीचा उल्लेख करताना मिटकरी भावूक झाले. “दादांनी दिलेल्या संधीमुळेच मला राज्याच्या प्रश्नांवर काम करण्याची ताकद मिळाली. आज दादा आपल्यात नाहीत, हे कटू वास्तव पचवणे कठीण आहे. त्यांची अनुपस्थिती ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी पोकळी आहे,” अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

नव्या इनिंगबाबत सूतोवाच

दुसरीकडे, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल मिटकरी यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पक्षाने झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे मिटकरी यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, “माझा संघर्ष अजून संपलेला नाही. उद्यापासून सुरू होणारा प्रवास अधिक संयमी, प्रगल्भ आणि महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नाते सांगणारा असेल,” असे म्हणत मिटकरी यांनी नव्या इनिंगचे सूतोवाच केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here